शेतकरी जात आहेत सावकाराच्या दारात
By Admin | Updated: August 21, 2014 23:56 IST2014-08-21T23:56:25+5:302014-08-21T23:56:25+5:30
महाराष्ट्र राज्य को-आॅप मार्केटींग फेडरेशन गोंदियातर्फे दि तालुका खरेदी विक्री अर्जुनी/मोरगावने गेल्या १३ ते ३० जून २०१४ या कालावधीत फक्त महागावच्या हमीभाव धान केंद्रावर जवळपास

शेतकरी जात आहेत सावकाराच्या दारात
खताचा भुर्दंड : धानाचे चुकारे मिळालेच नाही
महागाव : महाराष्ट्र राज्य को-आॅप मार्केटींग फेडरेशन गोंदियातर्फे दि तालुका खरेदी विक्री अर्जुनी/मोरगावने गेल्या १३ ते ३० जून २०१४ या कालावधीत फक्त महागावच्या हमीभाव धान केंद्रावर जवळपास ६५०० क्विंटल धान खरेदी केला. परंतु धान विकून एवढे दिवस लोेटूनही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना हमीभावानुसार केंद्रावर विकलेल्या धानाचे चुकारे मिळालेले नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर सावकारी कर्ज घेवून खरीप पिकांची सोय करण्याची पाळी आली आहे.
या भागातील स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी समजणाऱ्या उदासीन राजकारण्यांमुळे अजूनही शेतकऱ्यांच्या या समस्येकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही. शेतकऱ्यांची ही व्यथा एकाही राजकीय पुढाऱ्याला अजून दिसून आलेली नाही. आता त्यांची शेतकऱ्याविषयीची तळमळ कुठे गेली? असा सवाल या भागातील गरजू शेतकरी करीत आहेत.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आपला धान व्यापाऱ्यांना विकला असता तर प्रतिक्विंटल जवळपास ५० रु. जास्तीचे मिळाले असते. तसेच रोख रक्कम मिळाली असती. खत खरेदीवर सुध्दा प्रती बोरी १० रुपयांची बचत झाली असती. कारण सध्या शासकीय गोदामातील खताचा दर व्यापाऱ्याच्या दरापेक्षा १० रुपये प्रतीबोरी जास्त आहे.
एवढ्या सर्व हालअपेष्टा व नुकसान सहन करूनही शेतकरी चुपचाप आहेत. यापुढे त्यांच्या सहनशिलतेचा अधिक अंत न पाहता त्यांच्या धानाचे चुकारे त्वरीत देण्यात यावे, अथवा जर पुढे काही बरे वाईट घडल्यास त्यास धान खरेदी यंत्रणा संपूर्ण जबाबदार राहील असा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)