शेतकऱ्यांची दिवाळी गेली अंधारात
By Admin | Updated: October 30, 2014 22:54 IST2014-10-30T22:54:50+5:302014-10-30T22:54:50+5:30
दिवाळी येताच सर्वत्र आंनदाचे वातावरण असते. मात्र जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने व धानाचे भावदेखील फारच कमी असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली.

शेतकऱ्यांची दिवाळी गेली अंधारात
परसवाडा : दिवाळी येताच सर्वत्र आंनदाचे वातावरण असते. मात्र जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने व धानाचे भावदेखील फारच कमी असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. व्यापाऱ्यांनी दिवाळीच्या तोंडावरच धानाचे भाव कमी केले. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात पावसाच्या कमी प्रमाणामुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली. धानपिके वाचविण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नाला काही प्रमाणातच यश आले. तर दुसरीकडे धानपिकावर किड लागल्याने हाती आलेले पीकही वाया गेले. थोडेफार धानाचे उत्पन्न हाती आले. पण दिवाळीच्या तोंडावर धानाचे भाव कमी असल्याने त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चदेखील निघणे कठीण झाले होते.
हलक्या धानाचे भाव पडल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. शासकीय हमी भावाचा फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. संचालकांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची लवकरच कापणी व मळणी करुन धान विक्रीसाठी बाजारपेठेत आणले. मात्र शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने याचा पूरेपूर फायदा खासगी व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
शासनाने घोषित केलेल्या हमी भावापेक्षाही अंत्यत कमी दराने धानाची खरेदी करुन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. धानाच्या उत्पादन खर्च साधारणत: एक एकरासाठी १५ ते २० हजारापर्यंत आहे. मात्र त्या तुलनेत धानाला मिळणार भाव कमी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड परिसरात सुरू आहे. (वार्ताहर)