२.५ लाखांचा कॅमेरा चोरणाऱ्या प्रसिद्ध पक्षिमित्राला अटक
By Admin | Updated: November 4, 2014 22:41 IST2014-11-04T22:41:44+5:302014-11-04T22:41:44+5:30
नवेगावबांध या पर्यटनस्थळावरील ‘हॉलिडे होम’ या पर्यटन संकुलातून एका पर्यटकाचा दोन लाख ५० हजार रूपये किमतीचा विदेशी कॅमेरा अडीच वर्षांपूर्वी चोरी गेला होता. मात्र त्याचा छडा

२.५ लाखांचा कॅमेरा चोरणाऱ्या प्रसिद्ध पक्षिमित्राला अटक
गोंदिया : नवेगावबांध या पर्यटनस्थळावरील ‘हॉलिडे होम’ या पर्यटन संकुलातून एका पर्यटकाचा दोन लाख ५० हजार रूपये किमतीचा विदेशी कॅमेरा अडीच वर्षांपूर्वी चोरी गेला होता. मात्र त्याचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आले नव्हते. अखेर तक्रारकर्त्याने व त्यांच्या मित्रांनी संशयित व्यक्तीवर पाळत ठेवून अखेर त्याला साकोली पोलिसांच्या मदतीने पकडण्यात यश मिळविले. या प्रकरणात गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यात पक्षीमित्र म्हणून प्रसिद्ध असलेला भीमसेन डोंगरवार (४०) रा.धाबेपवनी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या फ्रेन्ड्स कॉलनीतील रहिवासी डॉ.श्रीकृष्ण बावीसकर हे नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात पर्यटनासाठी आपल्या काही मित्रांसह अडीच वर्षांपूर्वी आले होते. त्यांच्याजवळ २ लाख ५० हजार रूपये किमतीचा दूरवरील छायाचित्रे टिपणाऱ्या लेन्सचा कॅमेरा होता. ते नवेगावबांध पार्कमधील पर्यटन संकुलात वास्तव्याला होते.
नवेगावबांधच्या उद्यानात पर्यटन करीत असताना त्यांच्यासह धाबेपवनी येथील रहिवासी भीमसेव श्रीनारायण डोंगरवार होता. दरम्यान २६ जानेवारी २०१२ रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजताच्यादरम्यान त्यांचा महागडा कॅमेरा त्यांच्या निवासाच्या ठिकाणावरून चोरीला गेला. त्यानंतर बावीसकर व त्यांच्या मित्रांनी वसतिगृहाच्या परिसरात कॅमेऱ्याचा शोध घेतला, मात्र कॅमेरा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी नवेगावबांध पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंद केला होता.
पोलिसांना कॅमेरा चोराचा शोध लागला नाही. मात्र डॉ.बावीसकर यांना पर्यटनप्रसंगी सोबत फिरणारा भीमसेन डोंगरवार याच्यावर संशय होता. बावीसकर व त्यांच्या मित्रांनी या कालावधीत डोंगरवारवर पाळत ठेवली. दरम्यान कॅमेरा डोंगरवार कडेच असल्याची त्यांची खात्री पटली. बावीसकर यांनी कॅमेरा हस्तगत करून डोंगरवार यांना अटक करण्यासाठी साकोली पोलिसांची मदत मागितली. पोलिसांनी डोंगरवार यांना विशिष्ट कामासाठी साकोलीच्या टोलनाक्याजवळ बोलावले. यावेळी कॅमेरा डोंगरवारजवळच होता. हीच संधी साधून पोलिसांनी त्याला अटक केली.
कॅमेरा चोरीचा गुन्हा नवेगावबांध पोलीस ठाण्यात दाखल असल्यामुळे मंगळवारी ४ नोव्हेंबर रोजी साकोली पोलिसांनी भीमसेन डोंगरवारला नवेगावबांध पोलिसांच्या ताब्यात दिले. तपास अधिकारी पाटील यांनी संपूर्ण कागदपत्रांसह आरोपी डोंगरवारला न्यायालयात हजर केले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे सांगून आरोपीला पोलीस कोठडी देण्याची न्यायालयाला मागणी केली. मात्र कॅमेरा परत (रिकव्हर) झाल्याने न्यायालयाने डोंगरवार याला पोलीस कोठडी न देता जामीन देवून सोडल्याचे नवेगावबांध पोलीस ठाण्याचे अधिकारी पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)