उमेदवारांचे कुटुंबीय रंगलेय निवडणुकीत
By Admin | Updated: October 12, 2014 23:34 IST2014-10-12T23:34:59+5:302014-10-12T23:34:59+5:30
निवडणूक म्हटली की कसरत करणे हे एकट्याचे काम नाहीच. त्याला सहकार्याची जोड आवश्यक असते. कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या कुटूंबियांचा हात असतो असे म्हटले जाते.

उमेदवारांचे कुटुंबीय रंगलेय निवडणुकीत
अर्जुनी/मोरगाव : निवडणूक म्हटली की कसरत करणे हे एकट्याचे काम नाहीच. त्याला सहकार्याची जोड आवश्यक असते. कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या कुटूंबियांचा हात असतो असे म्हटले जाते. ते या विधानसभा निवडणुकीतून दिसून येत आहे. काही उमेदवारांच्या अर्धागिनी तर काही उमेदवारांचे संपूर्ण कुटूंब निवडणूक कार्य तडीस नेण्यात मश्गुल असल्याचे चित्र अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे.
या निवडणुकीसाठी एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत. दिवसरात्रीतील एकेक क्षण प्रत्येक उमदेवारासाठी महत्वाचा आहे. कार्यकर्ते तर मदतीला असतातच, परंतु उमेदवार प्रत्येक गावात पोहचून मदतारांच्या समस्या एवढ्या अल्पावधीत ऐकू शकत नाही. यासाठी कुटूंबातील व्यक्तीला काही भागात फिरवताना उमेदवार दिसून येतात.
भाजप उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी शारदा प्रचारात दिसून येतात. त्या भाजपच्या प्रदेश महिला आघाडीच्या सदस्या रचना गहाणे, लक्ष्मीकांत धानगाये यांच्या सोबतीने सडक/अर्जुनी तालुक्यात प्रचार करताना दृष्टीस आल्या. काँग्रेसचे उमेदवार राजेश नंदागवळी यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी वैशाली अनेक गावात प्रचार करताना दिसून येतात. शिवसेनेच्या उमेदवार किरण कांबळे यांच्या प्रचारासाठी त्यांचे दोन भाऊ केतन मेश्राम व महिंद्र मेश्राम हे प्रचार कामात गुंतले आहेत. आपले आप्तेष्ट कोणत्या गावात आहेत, ते गाव, स्वत:चे कार्यक्षेत्रात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत.
प्रचारासाठी कुटूंबातील सर्वाधिक सदस्यांचा वापर काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार रत्नदीप दहिवले हे करताना दिसून येत आहेत. त्यांच्या प्रचार मोहिमेत वडील सुखदेवकुमार दहिवले, आई मालन, भाऊ अनिल, वहीणी नूतन, पत्नी त्रिवेणी हे त्यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. अपक्ष उमेदवार दिलवर रामटेके यांच्या पत्नी सुषमा या प्रचारात व्यस्त आहेत. काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार अजय लांजेवार यांच्या प्रचारात त्याच्या पत्नी रिता मेहनत घेताना दिसत आहेत. याशिवाय इतर उमेदवारांच्या कुटूंबातील व्यक्ती सुध्दा प्रचार कार्यात मश्गूल आहेत.
बोंडगावदेवी : अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व पिरिपा युतीचे उमेदवार राजेश नंदागवळी यांची पत्नीू कुटुंबाची जबाबदारी सांभाळून प्रचार कार्यात सक्रीय उतरुन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर देत आहेत. सामान्य कुटुंबातील असलेले नंदागवळी यांना सर्वसामान्य जणांची सेवा करण्याची संधी द्या, अशी भावनिक साद वैशाली नंदागवळी मतदारांना घालताना मतदार क्षेत्रात दिसत आहे.
अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील चान्ना/बाक्टी या गावात प्रचारासाठी आलेल्या वैशाली यांची भेट सदर प्रतिनिधीनी घेतली. त्यावेळी त्या महिलांशी हितगुज साधून आपल्या पतीराजाला मतदान करा अशीे विनंती हात जोडून करताना दिसल्या. चान्ना गावात पाच-सहा महिलांच्या समूहाने वैशालीताईनी मतदारांच्या दारापर्यंत पोहोचून साद घातली. सकाळी घरकाम आटोपून रोज ९ वाजता घरुन निघून रात्रीच्या १० वाजेपर्यंत घरी जात असल्याचे वैशालीताईने सांगितले. मतदारांशी जवळीक साधताना त्या म्हणतात सर्वसामान्यांचे काम करण्यासाठी स्वत:ला झोकून देण्याची प्रवृत्ती, एका गरीब कुटुंबातील असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली. पक्षनेत्या सोनिया गांधीनी विश्वास संपादन करुन नंदागवळी यांना उमेदवारी मिळाली. कोणताही अहंभाव, मोठेपणा अंगी न बाळगण्याची प्रवृत्ती असलेले असा त्यांचा भाव आहे. आपले पती आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर राहतील अशी ग्वाही देण्याचा प्रयत्न वैशालीताई करताना दिसत आहे. मतदारांकडूनही कुटुंबियांना बऱ्यापैकी साथ मिळत आहे. (तालुका प्रतिनिधी)