खोटे श्रेय लाटत आहे भाजपची टोळी
By Admin | Updated: July 27, 2016 02:13 IST2016-07-27T02:13:18+5:302016-07-27T02:13:18+5:30
तत्कालीन कॉंग्रेस शासनाने मंजूर केलेली निधी. राज्य शासनाने वैशिष्टपूर्ण कार्य अंतर्गत मंजूर केलेला दोन कोटींचा निधी.

खोटे श्रेय लाटत आहे भाजपची टोळी
राकेश ठाकूर : मूर्ती रस्ता बांधकामप्रकरणी काँग्रेसची टीका
गोंदिया : तत्कालीन कॉंग्रेस शासनाने मंजूर केलेली निधी. राज्य शासनाने वैशिष्टपूर्ण कार्य अंतर्गत मंजूर केलेला दोन कोटींचा निधी. तसेच जिल्हा नियोजन समितीतील आमच्या तीन सदस्यांच्या प्रयत्नांमुळे बाजपेईचौक- सूरज चौक-भवानी मंदिर चौक पर्यंतच्या रस्ता बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाची टोळी या कामाचे भूमिपूजन करून खोटे लाटण्याचे काम करीत आहे. हा प्रकार अत्यंत आश्चर्यजनक व हास्यास्पद असल्याचे नगर परिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे गट नेता तसेच प्रभाग क्रमांक ७ चे सदस्य राकेश ठाकूर यांनी कळविले आहे.
ठाकूर यांच्या पत्रकानुसार, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने तत्कालीन कॉंग्रेस सरकारने गुरूनानक गेट-प्रेम जायस्वाल व सिंधी शाळा रस्त्यासाठी १३५ लाखांचा निधी सन २०१३ मध्ये मंजूर केला. त्या कामातून उरलेल्या ३५ लाखांतून मुर्री चौकी ते बाजपेई चौक रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.
तर बाजपेई चौक-सूरज चौक-भवानी चौक रस्ता बांधकामासाठी ४ कोटींची गरज होती. यातील २ कोटी वैशिष्टपूर्ण कार्य अंतर्गत मंजूर करीत राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. तर ४ फेब्रुवारीच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ५ मताधिकार प्राप्त सदस्यांतील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी बहुमताच्या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात रस्ता बांधकामासाठी २.०३ कोटींचा निधी देण्याची मागणी केली होती. यात पालकमंत्री व नगराध्यक्षांच्या विरोधात बहुमताच्या आधारावर रस्ताचे काम मंजूर करविण्यात आले.
विशेष म्हणजे या रस्ता बांधकामासाठी २.०३ कोटींचा निधी तसेच नगराध्यक्षांनी प्रस्तावीक केलेल्या कामांसाठी एकूण ५.९४ कोटींचा निधी उपलब्ध करवून दिला. मात्र नगराध्यक्षांनी अत्यंत हुशारीने सूरज चौक - पोस्टमेन चौक रस्ता वगळून स्वत: प्रस्तावीत केलेल्या अन्य कामांची निविदा काढून हा पैसा खर्च करण्याचा कट रचला होता. मात्र ही निवीदा बघताच आमदार अग्रवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत रस्त्यासाठी २.०३ कोटींचा निधी आरक्षीत ठेवून फक्त रस्ता बांधकामासाठीच नखर्च करण्याचे निर्देश दिले. परिणामी या रस्त्यासाठी निविदा झाली मात्र आतापर्यंत कार्यादेश देण्यात आलेले नाही.
एवढेच नव्हे तर निधीची कमतरता असल्याने स्वत:च्या प्रभागातील सुमारे ५० लाख रूपयांचे काम स्थगित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याचेही ठाकूर यांनी सांगीतले. हे सर्व केल्यानंतर मात्र भाजपचे नेता रस्त्याचे भूमिपूजन करून त्याचे श्रेय लाटत आहेत. विशेष म्हणजे, या समारंभापासून सुनियोजीत रित्या त्यांना दूर ठेवण्यात आल्याचेही त्यांनी कळविले. करिता मुख्याधिकाऱ्यांनी या मार्गावरील रस्ता दुभाजक बनविण्याचे तसेच रस्त्यावरील अतिक्र मण हटविण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)