आरोग्यसेवा पुरविण्यात सपशेल फेल
By Admin | Updated: May 16, 2015 01:18 IST2015-05-16T01:18:31+5:302015-05-16T01:18:31+5:30
कालीमाटी : ग्रामीण भागतील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उघडण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा पुरविण्यात मात्र सपशेल फेल ठरत आहे.

आरोग्यसेवा पुरविण्यात सपशेल फेल
लोहारा-कालीमाटी : ग्रामीण भागतील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उघडण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा पुरविण्यात मात्र सपशेल फेल ठरत आहे. देवरी तालुक्यातील मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राविषयीचे हे ग्राम पंचायत सदस्यांसह परिसरातील नागरिकांचे मत आहे.
देवरी तालुक्यातील मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांर्गत ४७ हजार ६६१ लोकसंख्येचा समावेश आहे. तसेच ११ उपकेंद्र, १८ ग्राम पंचायत, ६८ अंगणवाडी, एक आयुर्वेदिक उपकेंद्र असल्याने तालुक्यातील अतिजबाबदारीचे हे केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी लता गायकवाड मागील १८ वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी आरोग्य केंद्राला अद्ययावत केले.
मात्र कायम वैद्यकीय अधिकारी नसल्याने सेवेला खीळ बसत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. डॉ. देवरी वरून ये-जा करीत असल्याने रात्रीला रुग्णांचा जीव टांगणीवर असतो. त्यात एखादी इमर्जन्सी आल्यास येथील आरोग्य सेविका रूग्णाला देवरी किंवा गोंदिया येथे हलविण्यास प्रवृत्त करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हा परिसर अतिसंवेदनशील व दुर्गम असल्याने केंद्रांतर्गत पुराडा व इळूकचुआ येथे मोबाईल व्हॅन देण्यात आली आहे. पण पुराडा येथील मोबाईल व्हॅन मागील १० महिन्यांपासून नादुरूस्त असून पुराडा येथेच धूळ खात आहे. त्यामुळे येथील गरोदर महिला तसेच इतर रुग्णांना जलदगतीने आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी मोठी समस्या निर्माण होते.
केंद्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने रक्ताचे व इतर तपासणीचे नमूने बाहेर पाठविले जाते. त्यामुळे रिपोर्ट यायला विलंब होतो व रुग्णांच्या जीवाचा खेळ खेळल्या जातो. या सर्व समस्यांना घेऊनच काही दिवसांपूर्वी आरोग्य सेवेला घेऊन येथे आंदोलन करण्यात आले.
त्यामुळे काही प्रमाणात सुविधा मिळत असल्या तरी रात्रीच्या वेळी निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. येथील आरोग्य केंद्रात वर्षाकाठी ८० ते १०० प्रसूती होतात. त्यामुळे या आरोग्य केंद्रात सक्षम एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्तीची गरज असल्याचे नागरिक म्हणत आहे. (वार्ताहर)
चार ग्राम पंचायतींनी पाठविला ठराव
मुल्ला आरोग्य केंद्रात सक्षम अधिकारी नेमण्यात यावे, यासाठी या क्षेत्रातील ग्राम पंचायतींकडूनही धडपड सुरूच आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना फलित आलेच नाही. शेवटी केंद्रांतर्गत असलेल्या चार ग्राम पंचायतींनी या संदर्भात ठराव घेतला आहे. त्या ठरावाची प्रत त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री, आरोग्य संचालक, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पाठविली आहे.
आमदारांकडून वाढल्या अपेक्षा
क्षेत्राचे आमदार संजय पुराम हे आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या पुराडा या गावचे आहेत. आता आमदारच जवळचे असल्याने यांच्याकडे आदिवासीबांधव मोठ्या आशेने बघत आहेत. आमदारांना या सर्व बाबींची जाणीव असल्याने आता तरी त्यांच्या माध्यमातून आरोग्य केंद्रातील समस्यांवर तोडगा निघणार अशी अपेक्षा येथील आदिवासीबांधव बाळगून आहेत. मात्र अपेक्षांची पूर्तता कधी होते याची त्यांना प्रतीक्षा आहे.