चार तालुक्यात झाली अतिवृष्टी नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:25+5:302021-09-11T04:29:25+5:30

गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे पावसाअभावी वाळण्याच्या मार्गावर आलेल्या पिकांना संजीवनी मिळाली ...

Extreme rainfall was recorded in four talukas | चार तालुक्यात झाली अतिवृष्टी नोंद

चार तालुक्यात झाली अतिवृष्टी नोंद

गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे पावसाअभावी वाळण्याच्या मार्गावर आलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. गेल्या चोवीस तासात सडक अर्जुनी, गोरेगाव, सालेकसा आणि देवरी या चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर उर्वरित चार तालुक्यांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.

यंदा हवामान विभागाने पावसाचे वर्तविलेले अंदाज वारंवार खोटे ठरले. तर, जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत केवळ ६८ टक्के पाऊस झाला होता. सिंचन प्रकल्पांमध्ये सुद्धा ३५ टक्के पाणीसाठा होता. तर रोवणीनंतर पाऊस गायब झाल्याने धान पीक धोक्यात आले होते. तर पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात ४७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, आठपैकी चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे संकटातील धान पिकांना दिलासा मिळाला आहे.

.....................

पुजारीटोला धरणाचे ६ दरवाजे उघडले

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तर, मध्यप्रदेश आणि धरण क्षेत्रात सुद्धा चांगला पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुजारीटोला धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने या धरणाचे सहा दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले आहे.

.........................

जिल्ह्यात तालुका निहाय पडलेला सरासरी पाऊस

गोंदिया- २४.१ मिमी

आमगाव : ५४.५ मिमी

तिरोडा : २६.८ मिमी

गोरेगाव : ७६.० मिमी

सालेकसा : ७३.१ मिमी

देवरी : ७३.२ मिमी

अर्जुनी मोरगाव : १६.३ मिमी

सडक अर्जुनी : ६५.८ मिमी

..............................................

एकूण सरासरी : ४७.८ मिमी

Web Title: Extreme rainfall was recorded in four talukas