जिल्हा परिषदेकडून अनुकंपाधारकांचे शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:47+5:302021-03-18T04:28:47+5:30
आमगाव : जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा पदभरती संदर्भात कागदपत्रांसह अनुकंपाधारकाना १० मार्च रोजी बोलावण्यात आले होते. याबाबत ४ मार्च ...

जिल्हा परिषदेकडून अनुकंपाधारकांचे शोषण
आमगाव : जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा पदभरती संदर्भात कागदपत्रांसह अनुकंपाधारकाना १० मार्च रोजी बोलावण्यात आले होते. याबाबत ४ मार्च रोजी पत्र व्यवहार केल्याचे सांगितले जात आहे. पण पडताळणीच्या दिवसापर्यंत निम्म्यापेक्षा अधिक अनुकंपाधारकाना पत्रच प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यातही वेगवेगळ्या संमतीपत्रांची मागणी केलेली आहे. यातून जिल्हा परिषदेकडून अनुकंपाधारकांचा खेळ केला जात असल्याचा आरोप आहे.
गेल्या वर्षभर कोविड-१९, अधिकाऱ्यांच्या बदल्या, त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक अशा वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींना समोरे जाऊन कसातरी पद भरतीचा मुहूर्त निघाला. पण ती पदभरती नसून निव्वळ कागदपत्रांची पडताळणी होती. त्यातही सर्वांना पत्र न मिळाल्याने अनुकंपाधारकाची त्रेधातिरपीट उडाली. कित्येक सदस्यांनी जशी-तशी माहिती गोळा केली व जिल्हा परिषदेत आपल्या अपूर्ण कागदपत्रांसह पोहचले. विशेष म्हणजे, चिचगड, सालेकसा व जिल्ह्याबाहेरील अतिदुर्गम भागात वास्तव्यास असणाऱ्या लाभार्थ्यांना योग्य वेळेवर पत्र न मिळाल्याने ते या कार्यवाहीस मुकले. यातील एक सदस्य २०१३ पासून अनुकंपा प्रतीक्षा यादीत पात्र असून त्याला अचानक कोणताच पत्र व्यवहार न करता अपात्र आहे असे सांगितले गेले. गेल्या वर्षभरापासून पदभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पण भरतीला उशीर होणे या दरम्यानच्या काळात काही विशिष्ट दलाल पात्र सदस्यांशी संपर्क करून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप अनुकंपाधारक संघटनेचे अध्यक्ष संजय हत्तीमारे यांनी केला आहे.
.......
पारदर्शक प्रक्रिया पार पाडण्याची मागणी
या पुढील प्रक्रिया पारदर्शकरीत्या व रीतसर पत्रव्यवहाराने व्हावी जेणेकरून चारही बाजूने होरपळलेल्या अनुकंपाधारकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा हत्तीमारे यांनी व्यक्त केली आहे. अन्यथा कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला सामोरे जाण्याचा इशारा हत्तीमारे, अभय पालेवार, मंगेश मोहतुरे, मोनिका मानकर, ज्योती नानेट, ॠषिकेश भोंडे, महेश मेंढे यांनी दिला आहे.