हूक लावून वीज चोरीची ६९२ प्रकरणे उघड
By Admin | Updated: November 11, 2014 22:41 IST2014-11-11T22:41:42+5:302014-11-11T22:41:42+5:30
जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज चोरीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. कधी विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून तर कधी तारांवर आकडा लावून वीज चोरी केली जाते. या प्रकारांमुळे म.रा.वीज वितरण

हूक लावून वीज चोरीची ६९२ प्रकरणे उघड
देवानंद शहारे - गोंदिया
जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज चोरीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. कधी विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून तर कधी तारांवर आकडा लावून वीज चोरी केली जाते. या प्रकारांमुळे म.रा.वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकारांवर आळा घालण्यासाठी विद्युत विभागाचे भरारी पथक कार्यरत आहे. या पथकाने १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०१४ या सहा महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात तारांवर हुक लावून वीज चोरी करणाऱ्या ६९२ लोकांवर कारवाई केली आहे. तरीही वीज गळतीचे प्रमाण अजूनही कायम आहे, हे विशेष.
जिल्ह्यात गोंदिया व देवरी असे दोन विद्युत विभाग आहेत. गोंदिया विभागात गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, तिरोडा तालुका व गोरेगाव तालुका यांचा समावेश आहे, तर देवरी विद्युत विभागात देवरी, सडक/अर्जुनी, सालेकसा व अर्जुनी/मोरगाव तालुक्यांचा समावेश आहे. गोंदिया व देवरी या दोन्ही विद्युत विभागात एकच जिल्हास्तरीय भरारी पथक कार्यरत आहे. सर्व प्रकारच्या वीज चोरीच्या घटनांवर आळा बसावा यासाठी ते प्रयत्नशील असले तरी ज्या प्रमाणात वीज चोरी होत आहे त्या प्रमाणात त्यावर कारवाई करण्यासाठी हे एकमेव भरारी पथक तोकडे पडत आहे.
गोंदिया शहरात अनेक सार्वजनिक व खासगी कार्यक्रम, सार्वजनिक उत्सवांमध्ये बिनधास्तपणे आकडे टाकून वीज चोरी केली जाते. असे असताना या भरारी पथकाने गोंदिया शहरात गेल्या सहा महिन्यात आकडा लावून वीज चोरीचे केवळ एकच प्रकरण पकडले. यात ४१ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. पण ही दंडाची रक्कम अद्याप भरण्यात आलेली नाही.
गोंदिया ग्रामीण भागात एकूण १५६ लोकांना पकडून त्यांच्यावर सहा लाख ९० हजार रुपयांचा दंड आकारला. यापैकी ५९ प्रकरणांतून दोन लाख ८० हजार रूपये विद्युत विभागाला दंड प्राप्त झाला. तिरोडा तालुक्यात आकड्याद्वारे वीज चोरीची २० प्रकरणे पकडण्यात आली. त्यांच्यावर ५५ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. पण केवळ १८ प्रकरणांतून ४८ हजार रूपये विद्युत विभागाला प्राप्त झाले. गोरेगाव तालुक्यात अशाच प्रकारच्या विद्युत चोरीच्या ७० घटना घडल्या. सदर ७० दोषी व्यक्तींवर पाच लाख ६८ हजार रूपये दंड आकारण्यात आला. यात विद्युत विभागाला ४१ घटनांतून चार लाख २१ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अशाप्रकारे गोंदिया विद्युत विभागात आकड्याद्वारे वीज चोरीची एकूण २४७ प्रकरणे उघडकीस आणण्यात आली. त्यात दोषींवर १२ लाख ७३ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. मात्र केवळ ११८ लोकांकडून सहा लाख ७७ हजार रूपये दंडाची रक्कम भरण्यात आली. १२९ जणांनी अद्यापही दंडाची रक्कम भरलेली नाही. देवरी विद्युत विभागील देवरी तालुक्यात हुक लावून वीज चोरीची ४४ प्रकरणे भरारी पथकाने पकडली. त्यांच्यावर ७३ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. यात सर्वांनी दंडाची रक्कम भरली आहे. सडक/अर्जुनी तालुक्यात वीज चोरीची २०२ प्रकरणे पकडण्यात आली. त्यांच्यावर चार लाख ७७ हजार रूपये दंड आकारण्यात आला. यापैकी ११२ प्रकरणातून चार लाख पाच हजार रूपये विद्युत विभागाला मिळाले.
आमगाव तालुक्यात ४० प्रकरणे पकडण्यात आली. यातील सर्व दोषींकडून एक लाख ८० हजार रूपयांचा दंड प्राप्त झाला. सालेकसा तालुक्यात १०७ प्रकरणे पकडण्यात आली. या सर्व प्रकरणांतून पाच लाख ६२ हजार रूपये प्राप्त झाले. तर अर्जुनी/मोरगाव तालुक्यात ५२ प्रकरणे पकडण्यात आली. या सर्व प्रकरणांतून दोन लाख ४२ हजारांची रक्कम विद्युत विभागाला दंडाच्या स्वरूपात प्राप्त झाली.
देवरी विद्युत विभागात हुकद्वारे वीज चोरीची एकूण ४४५ प्रकरणे पकडण्यात आली. त्यांच्यावर १४ लाख ६७ हजार रूपये दंड आकारण्यात आला तर त्यापैकी ३५५ दोषींकडून १४ लाख ६५ हजार रूपये वसूल करण्यात आले.