जिल्ह्यात वर्षभरात ९९७.६३ लाखांचा खर्च
By Admin | Updated: May 3, 2017 00:58 IST2017-05-03T00:58:53+5:302017-05-03T00:58:53+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.

जिल्ह्यात वर्षभरात ९९७.६३ लाखांचा खर्च
देवानंद शहारे गोंदिया
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. त्या अंतर्गत जिल्ह्याला आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये एक हजार ४३८ कामांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी वर्षभरात ७५३ कामे पूर्ण झाली असून ६८५ कामे सुरूच आहेत. त्यासाठी आतापर्यंत ९९७.६३ लाखांचा खर्च झालेला आहे. प्रगतीपथावर असलेली कामे जून महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
यात गोबियन स्ट्रक्चरची ३३ कामे पूर्ण झाली असून १५१ कामे सुरू आहे. त्यावर ६.१ लाखांचा खर्च झालेला आहे. खोल समतल चराची १२ कामे पूर्ण तर ८० कामे प्रगतीपथावर आहेत. त्यासाठी २६.५३ लाख खर्च झाले. माती नालाबांध दुरूस्ती व गाळ काढणे ही ३७ कामे पूर्ण व सध्या दोन कामे सुरू आहेत. त्यावर ११.३३ लाख खर्च झाले. सिमेंट बंधारा, दुरूस्ती व गाळ काढण्याची ५२ कामे पूर्ण तर ३३ कामे प्रगतीपथावर असून त्यावर २३.८५ लाख खर्च झालेले आहे. नाला खोलीकरण व सरळीकरणाची १३४ कामे पूर्ण झाली असून ७५ कामे सुरू आहेत. त्यावर २६२ लाख खर्च झालेला आहे. गाळ काढण्याचे दोन कामे पूर्ण असून त्यासाठी ७.३० लाखांचा खर्च झालेला आहे.
भात खाचरे दुरूस्तीची २८५ कामे पूर्ण तर ११७ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यावर ३२६.२५ लाखांचा खर्च झालेला आहे. साठवण बंधाऱ्यांची २७ कामे प्रगतीपथावरच असून त्यासाठी आतापर्यंत ४०.१२ लाख खर्च झालेले आहेत. बोडी खोलीकरण व जुनी बोडी दुरूस्तीची ११७ कामे पूर्ण तर ४९ कामे सुरू असून त्यावर २३.१० लाख खर्च झालेले आहेत. तलाव खोलीकरण व दुरूस्तीची २९ कामे पूर्ण झाली असून १२ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यावर १४१.९७ लाखांचा खर्च झाला आहे. तीन मामा तलावांची दुरूस्ती करण्यात आली असून पाचचे काम सुरूच आहे. त्यासाठी १७ लाखांचा खर्च झाला आहे. लघू पाटबंधारे तलाव दुरूस्तीची सहा कामे पूर्ण व चार कामे प्रगतीपथावर आहेत. त्यावर ६५ लाखांचा खर्च झालेला आहे. खोदतळे व साठवण तलावांचे २८ कामे पूर्ण तर ७७ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यावर १८.७६ लाखांचा खर्च झालेला आहे. तसेच तलाव खोलीकरण व तलाव दुरूस्तीची (सीएसआर) १३ कामे पूर्ण झाली असून त्यासाठी २४.१२ लाखांचा खर्च झालेला आहे.
याशिवाय साखळी सिमेंट बंधाऱ्याची ३० कामे प्रगतीपथावर आहेत. केटी वेअर दुरूस्तीची ७ कामे, वन तलावाची १५ कामे व वळण बंधारा दुरूस्तीचे एक काम सध्या अपूर्ण असून प्रगतीपथावर आहेत. यातील काही कामे २०१७-१८ या आर्थिक वर्षात पूर्ण होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
जलयुक्त शिवार ही एक महत्वापूर्ण योजना असून योजनेच्या पूर्णत्वानंतर जिल्ह्यात जलसमृद्धी येण्याची शक्यता आहे.
बोडी व शेततळ्याची १९३ कामे पूर्ण
जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा पूर्ण झाल्या तर शेतकरी समृद्ध होतील, या उद्देशाने शासनाने मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला बोडी या योजना सुरू केल्या. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये यासाठी जिल्ह्याला ४५० कामांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी एकूण १९३ कामे पूर्ण झाली आहेत. मागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील एकूण १३२ देयक कोषागारात सादर करण्यात आले होते. ही देयके पारित होवून १३२ कामांसाठी ६२.७९ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तर मागेल त्याला बोडी योजनेत ६१ देयके कोषागारात सादर करण्यात आली होती. ही देयकेसुद्धा पारित होवून सदर ६१ कामांसाठी १८.५८ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.