एक्साईजचा फुसका ‘बार’
By Admin | Updated: July 4, 2015 02:03 IST2015-07-04T02:03:26+5:302015-07-04T02:03:26+5:30
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत असणाऱ्या ‘बिअर बार’चा परवाना रद्द करण्याचा आदेश एक्साईज विभागाच्या (राज्य उत्पादक शुल्क) आयुक्तांनी दोन वर्षांपूर्वी काढला होता.

एक्साईजचा फुसका ‘बार’
आयुक्तांच्या आदेशाला ठेवले बासनात
मनोज ताजने गोंदिया
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत असणाऱ्या ‘बिअर बार’चा परवाना रद्द करण्याचा आदेश एक्साईज विभागाच्या (राज्य उत्पादक शुल्क) आयुक्तांनी दोन वर्षांपूर्वी काढला होता. मात्र गोंदिया जिल्ह्यातील एक्साईज निरीक्षकांनी हा आदेश बासनात गुंडाळून ठेवला आहे. दोन वर्षात एकाही बारवर कारवाई झाली नसून एक्साईज विभागाचा हा आदेश अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित आणि बारमालकांना संरक्षण देण्याच्या भूमिकेमुळे ‘फुसका बार’ ठरला आहे.
राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून कोणतेही वाईन बार (परमीट रूम) अनुक्रमे ५० आणि ७५ मीटरपेक्षा जास्त अंतरावर असणे गरजेचे आहे. बार अगदी रस्त्यालगत असल्यास महामार्गावरून जाणारे वाहनधारक तिथे आपले वाहन उभे करून त्या बारमध्ये मद्यप्राशन निघतात आणि त्याच अवस्थेत वाहन चालवून स्वत:सोबत दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतात. यातून होणारे अपघात टाळले जावेत हा या नियमामागील हेतू आहे. हा नियम आधीपासूनच लागू असला तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बहुतांश ठिकाणी त्या नियमाचे तंतोतंत पालन झालेलेच नाही. त्याचाच गैरफायदा घेत अनेक बारमालकांनी महामार्गाच्या कडेलाच आपले बार थाटले आहेत.
यासंदर्भात ३ मे २०१३ आणि ३१ जुलै २०१४ असे दोन वेळा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी संपूर्ण राज्यातील जिल्हास्तरावर असलेल्या अधीक्षकांना पत्र देऊन या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासोबतच महामार्गावरील सर्व बार ५० आणि ७५ मीटर अंतराच्या नियमांत बसतात की नाही याची तपासणी करण्याचे आदेश दिले. जे बार नियमात बसणार नाहीत त्यांचा परवाना त्वरित रद्द करण्याचेही आदेश दिले. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत एकाही बार मालकांवर कारवाई करण्यात आलेली नाही.
पाच वेळा दिले स्मरणपत्र
महामार्गावरील सर्व बार अंतराच्या नियमात बसतात किंवा नाही याची तपासणी तहसीलदार, संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी संयुक्तपणे करायची आहे. मात्र गेल्या दोन वर्षातही त्यांच्यात संयुक्त तपासणीसाठी समन्वय घडून येऊ नये याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षकांनी गोंदिया आणि देवरी येथील निरीक्षकांना दोन वर्षात ५ वेळा स्मरणपत्र दिले आहे. त्यात देवरीच्या निरीक्षकांनी डिसेंबर २०१४ मध्ये आपला अहवाल सादर केला. मात्र सहा महिने लोटल्यानंतरही त्यांच्या अहवालावर अधीक्षक कार्यालयाने कोणतीच कारवाई केलेली नाही.
अंतर जास्त पडण्यासाठी अशीही शक्कल
कोणतेही बियर-वाईन बार हे राज्य महामार्गापासून ५० मीटरपेक्षा जास्त तर राष्ट्रीय महामार्गापासून ७५ मीटरपेक्षा जास्त असायला पाहीजे. या नियमाची कडक अंमलबजावणी आता होणार आणि आपले बार बंद होणार या धास्तीने आता काही बारमालकांनी दर्शनी भाग रस्त्याच्या बाजुने ठेवला असला तरी प्रवेशद्वार मात्र फिरवून मागच्या बाजुने ठेवले आहे. रस्त्यापासूनच बारचे अंतर मोजताना बारच्या इमारतीपर्यंतचे अंतर न मोजता बारच्या प्रवेशद्वारापर्यंतचे अंतर मोजले जात आहे. यातून अंतर नियमात बसेल एवढे वाढविण्याची शक्कल काही बारमालक लढवित आहेत.
देवरीतील १० बारवर येणार संक्रांत
देवरी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी तहसीलदार व ठाणेदारांच्या संयुक्त मोजणीचा अहवाल डिसेंबर २०१४ मध्ये सादर केला. त्यात ११ पैकी ९ बार हे अंतराच्या नियमात नियमबाह्यठरले आहेत. त्यामुळे परवाना रद्द होण्यासाठी पात्र ठरलेल्या बारमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील राज बार अॅन्ड रेस्टॉरंट सिरपूरबांध, महिमा बार अॅन्ड रेस्टॉरंट, रेशिम बार अॅन्ड रेस्टॉरंट, डॉल्फिन बार अॅन्ड रेस्टॉरंट, दिल्ली बार अॅन्ड रेस्टॉरंट, ग्रेट बार अॅन्ड रेस्टॉरंट, श्री जी बार अॅन्ड रेस्टॉरंट, हायवे बार अॅन्ड रेस्टॉरंट, दीक्षा बार अॅन्ड रेस्टॉरंट लोहारा आणि राज्य महामार्गावरील सम्राट बार अॅन्ड रेस्टॉरंट या बारचा समावेश आहे.