आठ महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:00:43+5:30

हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा देखील ठरला आहे. बुधवारी (दि.५) सायंकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप कायम होती. रात्रीच्या सुमारास गोंदिया,आमगाव,गोरेगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील नदी, नाले भरुन वाहत होते.

Excessive rainfall in eight revenue circles | आठ महसूल मंडळात अतिवृष्टी

आठ महसूल मंडळात अतिवृष्टी

Next
ठळक मुद्देदोन तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद : उर्वरित तालुक्यांना मात्र प्रतीक्षा कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दोन महिन्यांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोंदिया जिल्हावासीयांना गेल्या २४ तासात पडलेल्या पावसाने थोडा दिलासा मिळाला असून १५६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून गोरेगाव आणि आमगाव तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र उर्वरित सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा देखील ठरला आहे. बुधवारी (दि.५) सायंकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप कायम होती. रात्रीच्या सुमारास गोंदिया,आमगाव,गोरेगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील नदी, नाले भरुन वाहत होते.
आमगाव-कालीमाटी मार्गावरील नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने हा मार्ग काही तासांसाठी बंद झाला होता. तर आमगाव शहरातील काही वस्त्यांमध्ये सुध्दा पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
गोरेगाव येथे वार्ड क्रमांक १३ मध्ये नगर पंचायतच्या चुकीच्या बांधकामामुळे पाणी साचल्याने वार्डातील नागरिकांची गैरसोय झाली. मात्र पावसामुळे या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पावसाअभावी हजारो हेक्टरवरील रोवणी खोळंबली होती. तर केलेली रोवणी सुध्दा वाळण्याच्या मार्गावर होती यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र बुधवारी झालेल्या पावसामुळे शेतकºयांना थोडा दिलासा मिळाला आहे.
अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तिरोडा, देवरी आणि सालेकसा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने या तालुक्यातील नागरिकांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

या महसूल मंडळात झाली अतिवृष्टी
गेल्या २४ तासात गोंदिया तालुक्यातील कामठा महसूल मंडळात ७६ मिमी, गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव १७१.२० मिमी, कुºहाडी १६२.६० मिमी, मोहाडी ११०.१० मिमी तर आमगाव तालुक्यातील कट्टीपार १५१ मिमी, आमगाव १०९ मिमी, तिगाव ९८.८० मिमी, १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर आमगाव १२२.२० मिमी, गोरेगाव तालुक्यात सर्वाधिक १४७.९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पऱ्ह्यांना संजीवनी, रोवणीच्या कामाला वेग
पावसाअभावी मागील महिनाभरापासून रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या पऱ्ह्यांना संजीवनी मिळाली. आमगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्यातील रोवणीच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत सर्वात कमी पावसाची नोंद अर्जुनी मोरगाव तालुक्यात झाली असून येथील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Excessive rainfall in eight revenue circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस