चांगला रस्ता खोदून नवीन डांबरीकरण

By Admin | Updated: May 4, 2015 01:50 IST2015-05-04T01:50:34+5:302015-05-04T01:50:34+5:30

श्री चक्रधर स्वामीच्या पावनभूमीमध्ये चांगल्या डांबरीकरण रस्त्याला खोदुन त्याच्यावर नवीन खडीकरण करुन डांबरीकरण करण्यात आले.

Excellent road digging new rug | चांगला रस्ता खोदून नवीन डांबरीकरण

चांगला रस्ता खोदून नवीन डांबरीकरण

सुकडी (डाकराम) : श्री चक्रधर स्वामीच्या पावनभूमीमध्ये चांगल्या डांबरीकरण रस्त्याला खोदुन त्याच्यावर नवीन खडीकरण करुन डांबरीकरण करण्यात आले. खडीकरण रस्ता बांधकाम करीत असताना निकृष्ट साहित्याची गिट्टी व ओर साईजच्या गिट्टीचा वापर करुन डांबरीकरण करण्यात आले. डांबरीकरण करीत असताना साहित्य हे निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले असून या रस्त्याची चौकशी करुन कंत्राटदार व संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
श्री चक्रधर स्वामींच्या पावनभूमीत सुकडी-डाकराम ते प्राथमिक आरोग्य केंद्र व्हाया ठाणेगाव या डांबरीकरण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. ते खड्डे संबंधित विभागाने कधी डांबरीकरणाने दुरुस्त केले नाही. रस्त्याचे डांबरीकरण होवून कमीत कमी दोन ते तीन वर्षे लोटले. त्यावेळी जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले असते तर दोन-तीन वर्षांतच डांबरीकरण उखडला नसते. या रस्त्यावरून फक्त मोटार सायकल, जिप गाडी व सायकल जातात. जड वाहन या रस्त्याने जात नसतानाही रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते.
‘लोकमत’ने याबाबत बातम्या प्रकाशित करून या रस्त्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर तात्काळ सुकडी-डाकराम- प्राथमिक आरोग्य केंद्र-ठाणेगाव या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला.
सदर रस्त्याचे डांबरीकरण होतेच. काही ठिकाणी खड्डे पडले होते. पण या डांबरीकरण रस्त्याचे खड्डे डांबरीकरणाने दुरुस्ती करुन त्यावर नवीन डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होती. पण अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार साटेलोटे करून शासनाच्या निधीचा कसा दुरुपयोग करतात, हे यावरुन दिसून येते.
सदर रस्त्याचे थातुरमातूर खडीकरण फक्त ५६० मीटर करण्यात आले. ५०० मीटर डांबरीकरण रस्ता खोदण्यात आला. त्यावर खडीकरण करुन मुरुमाची पिसाई करण्यात आली. त्यानंतर पुन्हा गिट्टी टाकून त्याच्यावर डांबराचा फवारा घालून चुरी टाकण्यात आली. त्यानंतर साध्या मिक्चर मशीनद्वारे डांबरीकरण करण्यात आले. हे होत असताना या मार्गाने अधिकारी, कर्मचारी, आमदार व जि.प.चे उपाध्यक्ष, पं.स.चे उपसभापती व पदाधिकारी गेले. पण या डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा दर्जा पाहण्याची हिंमत कोणीही दाखविली नाही. ‘चोर-चोर मावस भाऊ’ असा हा प्रकार आहे.
सदर डांबरीकरण रस्त्याचे खडीकरण करण्यात आलेली गिट्टी ही बरोबर आकाराची आहे. पण त्यानंतर दुसरा कोट करण्यात आला. त्यामध्ये ४० एमएम साईजच्या काळ्या रंगाच्या गिट्टीचा वापर करणे गरजेचे होते. पण संबंधित कंत्राटदार यांनी ८० एमएमच्या गिट्टीचा वापर करुन रस्त्यावर दुसरा कोट चढविला. त्यानंतर बारीक चुरीचे मिक्सर मशिनद्वारे डांबरीकरण करण्यात आले. यामध्ये पुन्हा बदरीचा एक कोट करण्यात आले नाही.
विशेष म्हणजे केवळ ५०० मीटर रस्त्याचे खडीकरण-डांबरीकरण करण्यासाठी १० लाखांचा निधी मजूर करण्यात आला होता, असे संबंधित कनिष्ठ अभियंता निमकर यांनी सांगितले. पण या डांबरीकरण रस्त्यावर पडलेले खड्डे बुझवून त्यांवर डांबरीकरणाचा पूर्ण कोट करण्यात आला असता तर १० लाखामध्ये सुकडी-डाकराम ते व्हाया प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणेगाव मार्ग १.५ किमीच्या रस्त्यावर डांबरीकरण होवू शकले असते. पण तसेच न करता अधिकारी व कर्मचारी यांनी फक्त ५०० मीटरपर्यंत रस्त्याचे खडीकरण- डांबरीकरण करण्याचे निश्चित करुन १० लाख रुपयांच्या निधीचा दुरुपयोग केला. (वार्ताहर)

Web Title: Excellent road digging new rug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.