माजी सभापती कटरेंवर २७ लाखांची वसुली
By Admin | Updated: October 28, 2016 01:19 IST2016-10-28T01:19:46+5:302016-10-28T01:19:46+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सन २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये आर्थिक व्यवहारात अतिजास्त खर्च करण्यात आला

माजी सभापती कटरेंवर २७ लाखांची वसुली
नोटीस जारी : मंजूर तरतुदीपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप
तिरोडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सन २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये आर्थिक व्यवहारात अतिजास्त खर्च करण्यात आला असल्याचा आरोप करीत समितीचे मुख्य प्रशासक व सचिव यांनी माजी सभापती वाय.टी.कटरे यांना २७ लाख ५५ हजार ४०९ रुपये वसुलीसाठी नोटीस जारी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, संदर्भीय पत्रानुसार जिल्हा उपनिबंधक सह. संस्था गोंदिया यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक जिऊनि/नियम/कलम-४० / २०१४-१५ दि.८.५.२०१४, आर.एल.वाघे प्रधिकृत चौकशी अधिकारी यांचे दि.८.१०.१४ चे चौकशी अहवाल, सन २०१२-१३, २०१३-१४ चे लेखा परीक्षा अहवाल दि. ३०.३.२०१५ ला प्राप्त या संदर्भीय पत्रानुसार माजी सभापती व सचिव यांनी गैरव्यवहार व अति महत्वाचे आर्थिक दोष अहवालाा व लेखापरीक्षण अहवालात नमुद आहेत. त्यानुसार मुळ अर्थसंकल्पात मंजूर तरतुदीपेक्षा जास्त नियमबाह्य खर्च झालेल्या आहे. तो पुढीलप्रमाणे मंजूर तरतुदीपेक्षा जास्त खर्च १६०२६३७, बांधकामाकरीता घेतलेली अग्रीम उचल ५५००००, सभापती गाडी भाडा व डिझेल खर्च वैयक्तिकपणे केलेला खर्च ३६८६७२, समायोजीत करून काढलेले बील २०९१०००, असे एकूण २७३०४०९ रुपये व वैयक्तिक खतावणीप्रमाणे २५००० रुपये असे एकूण २७,५५,४०९ रुपये समितीचे रेकार्डवरून सदर राशी वसूल पात्र असल्याचे नोटीसामध्ये नमूद केले आहे. े
वरील आरोप वाय.टी.कटरे यांचेवर करण्यात आले असून याबाबत आपले काही म्हणणे असल्यास लेख खुलासा करण्यात यावा. या काळात दस्तऐवज पाहण्यासाठी समितीत उपलब्ध असल्याचेही नोटीसात नमूद केले आहे. खुलासा विहीत मुदतीत सादर न झाल्यास याबाबत आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून पुढील कायदेशीर कार्यवाही प्रस्थापित करण्यात येईल, असे नमूद केले आहे. वरील नोटीस दि.४.१०.१६ ला दिल असून दुसरे नोटीस १८.१०.२०१६ ला सुध्दा देण्यात आले. नोटीस-२ मध्ये नमुद केले की आपल्या पत्राचे अवलोकन केले असता आपला खुलासा समाधानकारक नाही. त्यामुळे ही नोटीस मिळताच समितीमध्ये २७५५४०९ रु. तत्काळ १५ दिवसाच्या आत भरणा करावा न केल्यास कायदेशीर कार्यवाही होईल.
- समितीने लावलेले आरोप निराधार-कटरे
समितीने लावलेल्या आरोपांबाबत माजी सभापती वाय.टी.कटरे यांना विचारले असता ते म्हणाले, २७.१२.२०१३ ला मी तिरूपती बालाजीकडे संचालकांसह निघालो असता हैद्राबादजवळ अपघात झाला. त्यात पाच महिने मी दवाखान्यात राहीलो. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सभापतीपदाचा राजीनामा दिला. २८.१२.२०१३ नंतर झालेल्या भ्रष्टाचारास मी जवाबदार नाही. २५ हजार रुपये प्रवास अग्रीम बाबत कोणत्याही प्रकारचे प्रवास भत्ता देयके व इतर खर्च जमा करू शकलो नाही. भरायचे झाल्यास ही रक्कम भरण्यास तयार राहील किंवा बिल जमा करेल, असे ते म्हणाले. बाकीचे आरोप निराधार असल्याचे ते म्हणाले.