स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाची
By Admin | Updated: September 6, 2015 01:35 IST2015-09-06T01:35:47+5:302015-09-06T01:35:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानातून आपल्या देशाला अन्य देशांप्रमाणे स्वच्छ करण्याचे स्वप्न बघितले.

स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाची
मान्यवरांची भावना : स्थिती सुधारण्याची आशा
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानातून आपल्या देशाला अन्य देशांप्रमाणे स्वच्छ करण्याचे स्वप्न बघितले. मात्र त्यांच्या या अभियानाला प्रसिद्धीचे एक माध्यम बनविण्यात आले. एक दिवस हातात झाडू घेतल्याने सफाई होत नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी समजून किमान स्वत:च्या घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा, अशी भावना शहरातील मान्यवरांनी ‘लोकमत परिचर्चेत’ व्यक्त केली. त्यासाठी स्वच्छता अभियान सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
देशाला घाणीपासून मुक्त करून स्वच्छ परिसर व स्वच्छ वातावरण निर्मितीसाठी स्वच्छ भारत अभियान छेडले. या अभियानांतर्गत अनेक जण स्वत: हाती झाडू घेतला व रस्त्यावर उतरले. खुद्द पंतप्रधान रस्त्यावर उतरल्याने त्यांचे चाहते व पक्षातील नेतेमंडळी व कार्यकर्तेच काय सामाजीक संस्था, शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालयांतही अभियान राबविण्यात आले. काही दिवस या स्वच्छता अभियानाचा जणू सर्वांनाच ज्वर चढला व पाहिजे तेथे स्वच्छता अभियान छेडले जाऊ लागले.
विशेष म्हणजे जिल्हास्तरावर तर समित्याही गठित करण्यात आल्या होत्या. यावरून स्वच्छता अभियान हे आता कायमस्वरूपी राबविले जाणार असल्याचे वाटत होते. मात्र कालांतराने नागरिकांचा तो भ्रम भंगला. त्यानंतर गोंदियाची शहराची स्थिती आहे ती सर्वांसमक्ष आहेच. बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार, कचरा व सांडपाण्याने तुंबलेल्या नाल्या दिसून येतात.
स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. यासाठी स्वत: आपापल्या घरातील कचरा एकत्र करून घंटागाडीत टाकावा. स्वच्छता अभियान हा कार्यक्रम शिकण्यासाठी चांगला आहे. मात्र नगर परिषदेची ही जबाबदारी असल्याने त्यांनी कर्मचारी व साहीत्यांत वाढ करावी. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तसेच चौपाटी, हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्रेत्यांत स्वच्छतेबाबत जागृती व गरज पडल्यास दंडात्मक कारवाई करण्याचीही गरज आहे.
रूपेश निंबार्ते
अध्यक्ष हिरवळ बहु. संस्था
स्वच्छता अभियान हे एक दिवसाचे नसावे. महिन्यातून एकदा तरी स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे. नगरसेवक व पालिका प्रशासनाकडून त्यांच्याकडे आहे तेवढ्या साधनांतून काम केले जात आहे. ते पर्याप्त नाही हे खरे आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: आपली जबाबदारी समजण्याची गरज आहे. पालिकेच्या भरवशावर राहून स्वच्छता होऊ शकत नाही. यासाठी सर्वांनी बाहेर पडावे. आपले घर व आपले परिसर स्वच्छ ठेवण्याचे कार्य जरी प्रत्येकाने केले, तरी शहर स्वच्छ होऊ शकते.
डॉ. धनश्याम तुरकर
शहरात बहुतांश नागरिक शिक्षीत असूनही ते आपल्या घरातील कचरा रस्त्यावर व नाल्यांत टाकत आहे. शहरात घंटागाडी सुरू आहे. मात्र दररोज प्रत्येकाच्या घरी घंटागाडी येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या घरातील कचरा गोळा करून एक-दोन दिवसांत येत असलेल्या घंटागाडीत टाकला पाहिजे. मात्र तसे होत नाही. नागरिक जागा मिळेल तेथे कचरा टाकून मोकळे होतात. आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी घराबाहेर कचरा टाकतात. कचरा साठविण्यासाठी आम्ही ४० कंटेनरचा ठराव पारित केला आहे. सोबतच डासांवर आळा घालण्यासाठी फवारणी व फॉंग्ािंगही करीत आहो. नागरिकांनीही सहकार्य केल्यास आपले शहर स्वच्छ ठेवता येईल.
-हर्षपाल रंगारी
उपाध्यक्ष, नगर परिषद, गोंदिया
नियमीत कचरा टाकण्यासाठी पालिकेकडून प्रयोजन करण्यात आलेले नाही. घंटागाडी नियमीत येत नाही. त्यात स्वच्छता अभियान चालविले जातात. एक-दोन दिवस अभियान चालते व नंतर तीच स्थिती निर्माण होते. पालिकेच्या भरवशावर राहून चालणार नाही. प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी समजून घेण्याची गरज आहे. आमच्या परिसरातील महिला एकत्र कचरा गोळा करून आठवड्यातून त्याची विल्हेवाट लावतो. अशाच प्रकारे कचरा इकडे-तिकडे न टाकता एकत्रित करावा.
-पूजा जोशी
गृहिणी