आॅनलाईन नामांकनाने सर्वांचीच तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2015 02:22 IST2015-06-12T02:22:17+5:302015-06-12T02:22:17+5:30

जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना बुधवारी

Everybody with an online enrollment | आॅनलाईन नामांकनाने सर्वांचीच तारांबळ

आॅनलाईन नामांकनाने सर्वांचीच तारांबळ

वेबसाईडमध्ये समस्या : उमेदवारांना माहितीच नाही, ग्रामीण भागात इंटरनेटची बोंबाबोंब
गोंदिया : जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना बुधवारी (दि.१०) जारी झाली. मात्र यावेळी प्रथमच आॅनलाईन पद्धतीने नामांकन भरायचे असल्याने ग्रामीणच नाही तर शहरी भागातही उमेदवारांची तारांबळ उडत आहे. दुसरीकडे निवडणूक विभागाकडून यासंदर्भात योग्य ती माहिती पुरविली जात नसल्याचा आरोप करीत विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन नामांकन दाखल करावे लागत होते. मात्र आता पहिल्यांदाच आॅनलाईन प्रणालीने इंटरनेटच्या सहाय्याने संगणकावर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज भरायचा आहे. बुधवारी निवडणुकीची अधिसूचना जारी करताना हा आॅनलाईन नामांकन फॉर्म नेमका कसा आहे, तो कसा भरायचा, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार याची माहिती तालुका स्तरावर उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र अनेक ठिकाणी ही माहिती पोहोचलीच नव्हती. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान गुरूवारी ही माहिती तालुकास्तरावर पोहोचविण्यात आली. मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे आणि काही ठिकाणी ती साईटच उघडत नसल्यामुळे दुसऱ्या दिवशीसुद्धा एकही नामांकन दाखल होऊ शकले नाही.
येत्या ३० जून रोजी मतदान असल्याने या निवडणुकीसाठी मतदारांपर्यंत पोहोचण्यास उमेदवारांकडे अतिशय कमी कालावधी आहे. त्यातच काही प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अजूनही निश्चित झालेले नाही. ५० टक्के महिला आरक्षणामुळे आणि राखीव गटातील उमेदवार वाढल्याने त्यांची निवड करताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना थोडा वेळ लागत आहे. मात्र गुरूवारी बहुतांश राजकीय पक्षांच्या उमेदवारांची यादी निश्चित झाली होती. आता नामांकन दाखल करण्यासाठी फक्त चारच दिवस उरले असल्याने शुक्रवारपासून नामांकन दाखल करण्यासाठी एकच धांदल उडणार आहे.

सर्व पक्ष स्वतंत्रपणेच लढणार
४विधानसभा निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही सर्व पक्ष आपापले उमेदवार रिंगणात उतरवित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच नाही तर सध्या केंद्र व राज्य सरकारमध्ये युतीत सहभागी असलेले भाजप आणि शिवसेनासुद्धा स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे करीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीची रंगत आणखी वाढणार आहे.
मतदानाच्या वेळेत बदल
४या निवडणुकीसाठी येत्या ३० जून रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा आणि देवरी हे तीन तालुके नक्षलग्रस्त असल्याने या तालुक्यात मतदानाच्या वेळेत राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. या तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ सकाळी ७.३० वाजता ते दुपारी ३ वाजतापर्यंतच राहणार आहे. गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी मोरगाव या पाच तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान घेण्यात येणार आहे.

जात वैधता प्रमाणपत्राबद्दल संभ्रम कायम
४यावेळी राखीव गटातून नामांकन दाखल करणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. मात्र अनेक उमेदवारांनी त्यासाठी अर्ज करूनही त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले नाही. यावेळीसुद्धा त्याबाबतची पावती ग्राह्यधरावी अशी मागणी काँग्रेसचे आदिवासी नेते सहेसराम कोरोटे यांनी केली. याशिवाय दोन दिवस आॅनलाईन प्रक्रियेतील गडबडीमुळे कोणी नामांकन दाखल करू शकले नाही. त्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी दोन दिवसांची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी केली.

या कागदपत्रांची गरज
४ गुन्हा दाखल नसल्याबाबतचे शपथपत्र
४ दोनपेक्षा जास्त अपत्ये नसल्याबद्दलचे शपथपत्र
४ निवडणुकीचा खर्च तीस दिवसांत दाखल केला जाईल, याबाबतचे हमीपत्र.
४ जात वैधता प्रमाणपत्र.
४ नामांकन कोणत्याही वेळेत भरता येईल. फक्त त्याची प्रिंटेड प्रत सकाळी ११ ते ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यायची आहे.

पहिल्यांदा आॅनलाईन नामांकन प्रक्रिया होत असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत आहे. मात्र ही प्रक्रिया खूप कठीण नाही. त्याबद्दल सांगण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर महाआॅनलाईनच्या संग्राम केंद्रांवर दोन-दोन लोक ठेवले आहेत.
- उमेश काळे
उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग

Web Title: Everybody with an online enrollment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.