प्रत्येक महिन्यात राबवू अभियान
By Admin | Updated: November 6, 2014 01:58 IST2014-11-06T01:58:16+5:302014-11-06T01:58:16+5:30
शासनाने स्वच्छ ग्राम-स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. तसेच तिरोडा तालुक्याच्या चिरेखनी गावात जगनाबाठू वाघदेव बाबा मंदिराच्या जिर्णोद्धाराचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे.

प्रत्येक महिन्यात राबवू अभियान
गोंदिया : शासनाने स्वच्छ ग्राम-स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. तसेच तिरोडा तालुक्याच्या चिरेखनी गावात जगनाबाठू वाघदेव बाबा मंदिराच्या जिर्णोद्धाराचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. त्यानिमित्ताने चिरेखनी येथे बुधवार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण गावाची स्वच्छता करण्यात आली. यात संपूर्ण ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.
स्वच्छता ही काळाची गरज आहे. स्वच्छता नसेल तर गावात रोगराईचे प्रमाण वाढते. आपले घर, परिसर व गाव नेहमी स्वच्छ ठेवावे. स्वच्छतेचे महत्त्व जाणून स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानेच चिरेखनी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सहभागी झालेल्या संपूर्ण ग्रामस्थांनी चिरेखनी गावात प्रत्येक महिन्यातून एकदा संपूर्ण स्वच्छ करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या स्वच्छता अभियानाची सुरूवात चिरेखनीच्या हनुमान मंदिर चौकातून करण्यात आली. सोबतच एक ट्रॅक्टर-ट्रॉली ठेवण्यात आली. यानंतर वार्ड-३ मधून संपूर्ण साफसफाई करण्यात आली. जमा झालेला केरकचरा ट्रॉलीमध्ये घालून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यानंतर चिरेखनी ग्रामपंचायत ते जि.प. पूर्व माध्यमिक शाळेपर्यंतच्या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. यात वार्ड-२ मधील नालंदा बुद्ध विहार व शिवमंदिर परिसरातील केरकचरा जमा करून ट्रालीत घालण्यात आला. गावाच्या मधातील वार्ड-१ चीसुद्धा साफसफाई करण्यात आली. यानंतर जमा झालेला गावातील संपूर्ण केरकचरा व घाण ट्रॅक्टर-ट्रॉलीने गावाबाहरे दूर अंतरावर नेवून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
चिरेखनी गावातील प्रत्येक नाली व प्रत्येक गल्ली स्वच्छ असावी, गावात डास असू नये, गावात आजार पसरू नये, संपूर्ण गावात आरोग्य, शांतता व सुव्यवस्था नांदावी यासाठी दर महिन्यात ग्रामपंचायत प्रशासन नेहमीच पुढाकार घेईल व संपूर्ण गाव घाणमुक्त करण्यासाठी नेहमीच प्रयत्न सुरू राहतील. त्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे सरपंच जगन्नाथ पारधी यांनी सांगितले. कृउबासचे संचालक रमेश टेंभरे यांनी गावात दर महिन्यात सदर अभियान राबवून नवीन आदर्श निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला. या स्वच्छता अभियानात प्रामुख्याने तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश टेंभरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र कोटांगले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवचरण शहारे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष देवचंद रिनाईत, सरपंच जगन्नाथ पारधी, माजी ग्रा.पं. सदस्य भोजलाल पटले, डॉ. मेखचंद शहारे, गोपीचंद रिनाईत, गेंदलाल पारधी, माजी सरपंच उमेंद्र पारधी, इंदल बिसेन, पंतूलाल पारधी, खेमू रिनाईत, भागवत पारधी, उदेलाल पारधी, उपसरपंच सोनू पारधी, गणेश पारधी, छगणलाल पारधी, भावराव कोटांगले, घनश्याम जांभूळकर आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)