प्रत्येक बालमजूर पालकाने आधारकार्ड काढावे
By Admin | Updated: September 30, 2016 02:00 IST2016-09-30T02:00:01+5:302016-09-30T02:00:01+5:30
प्रत्येक बालमजूर पालकाने आधारकार्ड बनविणे गरजेचे आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे,

प्रत्येक बालमजूर पालकाने आधारकार्ड काढावे
एन.एन. मेश्राम : बालमजूर पालकांचा मेळावा
गोंदिया : प्रत्येक बालमजूर पालकाने आधारकार्ड बनविणे गरजेचे आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे, असे मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.एन. मेश्राम यांनी केले.
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समिती जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत मुंडीकोटा येथील घोगरा चौकीमधील बालमजूर विशेष प्रशिक्षण केंद्रात झालेल्या पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलन करून मेळाव्याची सुरूवात झाली. उद्घाटन सरपंच गीता देव्हारे यांच्या हस्ते, मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.एन. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून प्रकल्प संचालक महेंद्र रंगारी, ए.एम. चामट, मुख्याध्यापक सी.बी. अंबुले, प्रकल्प समन्वयक नितिन डबरे, टी.एम. डोहळे, प्रकाश शेंडे उपस्थित होते.
प्रास्ताविकातून रंगारी यांनी, कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये, यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. सदर केंद्रातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सवलतीबाबत माहिती देवून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना दररोज केंद्रात पाठवावे व घरीदेखील त्यांच्या शिक्षणाबाबत माहिती द्यावी, असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेंडे यांनी, मांगगारोडी समाजात शिक्षणामुळे काय बदल होवू शकते, याबद्दल माहिती दिली. मुख्याध्यापक सी.बी. अंबुले यांनी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीमार्फत होणाऱ्या कार्याची प्रसंशा केली व सदर प्रकल्पामुळे अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक बालपण वाचविण्यास मदत होईल, असे सांगितले.
केंद्रप्रमुख ए.एम. चामट यांनी, पालकांनी काळानुरूप बदलून आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तर सरपंच गीता देव्हारे यांनी मांगगारूडी समाजात असणाऱ्या अंधश्रद्धेबाबत मत व्यक्त करून, शिक्षणामुळे अंधश्रद्धेतून मुक्ती मिळेल, असे मार्गदर्शन केले.
संचालन खेमराज कटरे यांनी केले. आभार मुनेश्वर शेंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विशेष संक्रमण केंद्राचे संदीप सोनवाने, सुनिता भांडारकर, दिलीप बिसेन, माधुरी कंगाले यांनी सहकार्य केले. याप्रसंगी बालक कामगारांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)