हद्द नसली तरी करावीच लागते झिरोची कायमी; गुन्हा घडलेल्या ठिकाणी केले जाते ट्रान्सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:34 IST2021-09-07T04:34:59+5:302021-09-07T04:34:59+5:30
गोंदिया : अन्यायग्रस्त व्यक्ती पोलीस ठाण्याची वाट धरते; परंतु बहुतेक लोकांना डायरीवर बसलेले पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार आधी हद्द ...

हद्द नसली तरी करावीच लागते झिरोची कायमी; गुन्हा घडलेल्या ठिकाणी केले जाते ट्रान्सफर
गोंदिया : अन्यायग्रस्त व्यक्ती पोलीस ठाण्याची वाट धरते; परंतु बहुतेक लोकांना डायरीवर बसलेले पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार आधी हद्द सांगा, ही हद्द आमच्या पोलीस ठाण्यातील नाही असे सांगून दुसऱ्या पोलीस ठाण्यात तक्रार करायला जाण्याचा सल्ला देतात. हद्दीच्या नावावर तक्रारकर्त्याला या ना त्या पोलीस ठाण्यात फिरविले जाते.
जिल्ह्यात १६ पोलीस ठाणे असून त्यांच्या सीमा एकमेकांना लागून असतात. सीमेवर अनेकदा मृतदेह आढळले, मारहाण, लूटमार झाली किंवा शेतातून मोटारपंप चोरी झाले तर ती हद्द आमची नाही म्हणून पोलीस तक्रारकर्त्याला तक्रार न घेता परत पाठवितात. एखाद्या अन्याय झालेल्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले, तर त्या तक्रारकर्त्याची तक्रार न घेता त्यांना दुसऱ्या पोलीस ठाण्याची हद्द म्हणून परत पाठविले जाते. या प्रकारामुळे तक्रारकर्ता त्रस्त होऊन जातो. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडला नसला तरी तक्रारकर्ता तक्रार देण्यासाठी आला, तर त्या पोलीस ठाण्यात तक्रार घेणे सीआरपीसी १५४ प्रमाणे आवश्यक आहे; परंतु अनेक पोलीस या कलमाचे उल्लंघन करून तक्रार घेत नाहीत. महिला अत्याचाराच्या तक्रारी असल्या तर त्यांना पोलीस आधी घेतात.
....................................
जिल्ह्यातील पोलीस ठाणे -१६
जिल्ह्यात पोलीस अधिकारी-१२१
जिल्ह्यात पोलीस कर्मचारी-२१०१
...................
तक्रार दाखल करून न घेतल्यास होणार चौकशी
एखादा गंभीर गुन्हा असला आणि तो गुन्हा दाखल करण्यास पोलीस नाकारत असले तर त्याची तक्रार झाल्यास संबंधित पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यावर चौकशी बसविली जाते. चौकशीत ते दोषी आढळले तर त्यांच्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाईदेखील करतात. तो गुन्हा किती मोठा आणि त्याचे गांभीर्य, तक्रारकर्त्याला घटनास्थळाच्या ठिकाणी जाण्यास होत असलेला त्रास हे सर्व बघितल्यावरच पोलीस कर्मचारी दोषी आहेत किंवा नाही हे ठरविले जाते.
........................
ही घ्या उदारहणे
१) आमगाव, सालेकसा व गोरेगाव या तीन पोलीस ठाण्यांची हद्द मांडोबाई देवस्थान, देवाटोला व बघेडा या तीन परिसरात आहे; परंतु ४ महिन्यांपूर्वी एका शेतातून मोटारपंप चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी शेतकरी आमगाव, सालेकसा व गोरेगाव पोलीस ठाण्यात गेला असता त्याला ही हद्द आमच्या ठाण्यातील नाही असे सांगून टाळण्यात आले. नंतर ती हद्द आमगाव पोलीस ठाण्यातच असल्याने आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
.............
२) गोंदिया शहर पोलिसांकडे १५ दिवसांपूर्वी एका तरुणीने आपला लैंगिक छळ नागपुरात झाल्याची तक्रार केली. ती तक्रार गोंदिया शहर पोलिसांनी नोंदवून झिराेची कायमी करून तो गुन्हा गणेशपेठ नागपूर पोलिसांकडे वर्ग केला आहे. महिलांच्या गुन्ह्याला पोलीस आधी दाखल करतात, हे विशेष.