उन्हाचे चटके अन् कार्यकर्त्यांचा उत्साह
By Admin | Updated: May 17, 2014 00:18 IST2014-05-17T00:18:23+5:302014-05-17T00:18:23+5:30
लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच भंडार्यात गर्दी केली होती. महिलांची गर्दी उल्लेखनीय होती. निकालाच्या उत्सुकतेमुळे लोकांनी उन्हाची पर्वा केली नाही.

उन्हाचे चटके अन् कार्यकर्त्यांचा उत्साह
संजय साठवणे - भंडारा लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच भंडार्यात गर्दी केली होती. महिलांची गर्दी उल्लेखनीय होती. निकालाच्या उत्सुकतेमुळे लोकांनी उन्हाची पर्वा केली नाही. शहरातील प्रत्येक रस्त्यावर गर्दीच दिसून आली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे वाहनधारकांना पायी फिरावे लागले. आवागमनाचे अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. या दरम्यान पानटपरी, हॉटेलमध्येही कमालिची गर्दी दिसून आली. एक्झीट पोलच्या आकडेवारीनंतर भाजपचे कार्यकर्ते उत्साही होते. परंतु प्रत्यक्षात निकाल कसा लागेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती. त्यामुळे भंडारा येथे भाजप कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजप समोर असल्याचा निकाल येताच कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद चौकात मोठय़ा प्रमाणात आतषबाजी केली. नाना पटोले यांच्या विजय होणार याहेतुने त्यांनी रथ तयार करण्यात आलेला रथ जिल्हा परिषद चौकासमोर ठेवण्यात आला होता. येणार्या जाणार्यांचे या रथाकडे लक्ष जात होते व कार्यकर्तेही कुतुहलाने पाहत होते. आ.नाना पटोले यांचे मुळ गाव सुकळी असल्याने साकोली येथे आ.पटोले यांच्यावर लोकांचे विशेष आकर्षण आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आतुरता साकोलीवासीयांना जास्तच होती. साकोलीत सकाळपासून भाजप कार्यकर्त्यात कुतूहल होती. नाना निवडून तर नक्कीच येतील मात्र मते किती घेतील. प्रसार माध्यमातून व भंडारा येथून वार्ता मिळताच साकोली परिसरात आतिशबाजी सुरू करण्यात आली. या दरम्यान भाजप कार्यकर्त्यात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून येत होते. लोकसभेच्या निकालाची प्रतिक्षा विधानसभेच्या इच्छुकांसाठीही होती. लोकसभा निवडणूक पार पडली की विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू होणार, अशी चर्चा होती.