‘सारस फेस्टीवल’चा गोंधळ संपता संपेना
By Admin | Updated: December 18, 2015 02:19 IST2015-12-18T02:19:44+5:302015-12-18T02:19:44+5:30
मंगळवारपासून शुभारंभ झालेल्या ‘सारस फेस्टीवल’चा गोंधळ दोन दिवसानंतर अजूनही संपलेला नसल्याचे दिसून येत आहे.

‘सारस फेस्टीवल’चा गोंधळ संपता संपेना
स्पर्धेबाबत स्पष्ट माहिती नाही : संबंधितांकडून केली जातेय टाळाटाळ
गोंदिया : मंगळवारपासून शुभारंभ झालेल्या ‘सारस फेस्टीवल’चा गोंधळ दोन दिवसानंतर अजूनही संपलेला नसल्याचे दिसून येत आहे. या महोत्सवांतर्गत घेण्यात येणाऱ्या ‘फोटो शूट’ स्पर्धेबाबत योग्य ती माहिती मिळत नसल्याने या स्पर्धेत भाग घेण्याचा ठराविक दिवस कोणता हेच कोणाला माहीत नाही. शिवाय या फेस्टीवलची जबाबदारी ज्यांच्यावर देण्यात आली त्यांच्याकडूनही माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने या महोत्सवाचे तंतोतंत नियोजन अद्याप झालेलेच नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
आजघडीला धानाचे कोठार म्हणून ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन विकासासाठी धडपड करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जिल्ह्यात पर्यटन विकास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा प्रशासनाचा हेतू आहे.
यातूनच जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पर्यटन समितीकडून ‘सारस फेस्टीवल’ची संकल्पना साकारली जात आहे. पण दिड महिना हा महोत्सव चालणार असताना त्याचे नियोजन मात्र अजूनही झालेले नाही.
या महोत्सवांतर्गत फोटो शूट व पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच सायकल मॅराथॉन, जनजागृती यासारखे अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मात्र जिल्हातरावर सोडाच, गोंदिया शहरवासीयांपर्यंतही या महोत्सवातील कार्यक्रमांची माहिती पोहोचलेली नाही. प्रचार-प्रसाराअभावी नागरिक या महोत्सवाबाबत अनभिज्ञ आहेत.
फोटो शूट स्पर्धेसाठी बाहेरील पक्षी, प्राणी व निसर्गप्रेमी फोटोग्राफर्सकडे संपर्क साधला जात असल्याचे काही निसर्गप्रेमींनी सांगितले. दिड महिने कालावधीच्या या महोत्सवात या फोटोग्राफर्सकडून २५ जानेवारीपर्यंत फोटो मागविण्यात आले आहेत. मात्र स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणी कधीपर्यंत करायची हे स्पष्ट केलेले नाही. किती जणांनी आतापर्यंत नोंदणी केली हेही सध्या गुलदस्त्यात आहे. स्पर्धकांसाठी किती पुरस्कार राहणार याचीही माहिती नाही. अशा परिस्थितीत या स्पर्धेला किती प्रतिसाद मिळणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
तीन महिन्यांपूर्वीच ठरली होती तारीख
अशा प्रकारचा सारस महोत्सव गोंदियात घ्यायचा हे तीन महिन्यांपूर्वीच ठरविण्यात आले होते. त्याच वेळी महोत्सवाची तारीखही निश्चित केली होती. असे असताना गेल्या तीन महिन्यात महोत्सवाचे नियोजन का होऊ शकले नाही? हा कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. याबाबत महोत्सवाशी संबंधित निसर्गप्रेमी संस्थांचे सदस्य, समितीमधील अधिकारी यांना विचारले असता कोणीच योग्य उत्तर न देता एकमेकांकडे बोट दाखविले. त्यामुळे कोणाचाच पायपोस कोणात नाही हे दिसून येत आहे.
महोत्सवासाठी पाच लाखांचा निधी
या महोत्सवासाठी पाच लाखांच्या निधीचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा पर्यटन समितीचे सदस्य सचिव बी.एस.घाटे यांनी सांगितले. मात्र महोत्सवाबाबत अन्य माहिती मात्र आपल्याकडे नसल्याचे ते म्हणाले. महोत्सवाची संपूर्ण जबाबदारी विजय ताटे यांच्याकडे असल्याचे सर्वांनीच सांगितले. ताटे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून माहिती देण्यात टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे या महोत्सवात नेमके काय सुरू आहे, हेच कळायला मार्ग उरलेला नाही.