गोंदियात प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण
By Admin | Updated: April 9, 2017 00:05 IST2017-04-09T00:05:40+5:302017-04-09T00:05:40+5:30
नगर परिषदेतर्फे शुक्रवारी अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याने पहिल्याच दिवशी पत्रकार व पोलिसांवर

गोंदियात प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण
प्रशासकीय अधिकाऱ्यांची कबुली : गुंडगिरी करणाऱ्या २० व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
गोंदिया : नगर परिषदेतर्फे शुक्रवारी अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याने पहिल्याच दिवशी पत्रकार व पोलिसांवर काही व्यापाऱ्यांनी हल्ला करून ही मोहीम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात २० व्यापाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान व्यापाऱ्यांच्या गुंड प्रवृत्तीला भीक न घालता अतिक्रमण हटवावे, असा सार्वत्रिक सूर गोंदियावासीयांकडून उमटल्यानंतर ही मोहीम पूर्ण करण्याचा निश्चय नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. गोंदिया शहरातील प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण असल्याची कबुली नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे यांनी दिली आहे.
गोंदिया शहराचे आधीच अरूंद रस्ते, त्यात व्यापाऱ्यांचे रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविणे गरजेचे झाल्याने नगर परिषदेकडून शुक्रवारपासून मोहीम सुरू करण्यात आली. रस्त्यावरील पक्के अतिक्रमण तोडण्यासाठी नगर परिषदेतर्फे जेसीबी लावण्यात आला. स्टेडियम परिसरात कारवाई केल्यानंतर बाजार परिसरात गेलेल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालून पत्रकार व पोलिसांच्या अंगावर हात टाकून काही गुंड प्रवृत्तीच्या व्यापाऱ्यांनी ही मोहीम थांबविण्याचा प्रयत्न केला. यात पोलीस मुख्यालयातील कॅमेरामन नागेश्वर दासरवा, वाहतूक शाखेच्या महिला पोलीस मंगला प्रधान यांच्यावरही हल्ला झाला. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी २० व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. भरत गोलानी, गिरीष गोलानी, आकाश गोलानी, गुड्डू ककवानी, नरेश गोलानी, निरज मानकाणी, जय गोलानी, रवि गोलानी व इतर १२ अशा २० व्यापाऱ्यांवर भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३३२, ३५३, ३५४, ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोंदियातील प्रत्येक रस्त्यावर व्यापाऱ्यांचे अतिक्रमण असल्याने ते अतिक्रमण हटविताना पोलीस संरक्षणाशिवाय मोहीम राबविताच येत नाही. वाहतूक शाखेच्या १० पोलिसांच्या मदतीने सदर मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवार-रविवार शासकीय सुटी असल्यामुळे ही मोहीम शांत राहणार असून सोमवारी पुन्हा मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)
अतिक्रमण करणारे शिरजोर
गोंदिया शहरातील प्रत्येक रस्ता अतिक्रमणाने व्यापलेला आहे. वर्षानुवर्षे व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढले जात नसल्याने ते आता शिरजोर झाले आहेत. त्यामुळे कारवाई करणाऱ्या यंत्रणेला अमानुष मारहाण केली जाते. १० पोलीस व २५ नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या समक्ष झालेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांबद्दल नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यांच्यावर कारवाई करून एकदाचे गोंदिया शहर अतिक्रमणमुक्त करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
नगर परिषदेकडून भेदभाव?
नगर परिषदेच्या रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांचे साहित्य जप्त करण्याची तरतूद महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ च्या कलम १७९ अंतर्गत आहे. परंतु अतिक्रमण हटाव मोहीमेत स्टेडियम परिसरातील फक्त दोन ते तीन दुकानातील थोडेसे साहित्य अतिक्रमण हटाव मोहीमेत जप्त करण्यात आले. त्यानंतर कोणत्याही दुकानातील रस्त्यावर असणारे साहित्य नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव दस्त्याने जप्त केले नाही. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीमेवर नगर परिषदेची भूमिका कडक नसून भेदभाव केला जात असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.