अतिक्रमण गावकरीच शुक्रवारी हटविणार

By Admin | Updated: June 7, 2015 01:43 IST2015-06-07T01:43:05+5:302015-06-07T01:43:05+5:30

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी (विहिरगाव) येथील मामा तलावातील अतिक्रम काढण्याबाबत ठराव घेण्यात आला.

The encroachment will be removed on Friday | अतिक्रमण गावकरीच शुक्रवारी हटविणार

अतिक्रमण गावकरीच शुक्रवारी हटविणार

अतिक्रमण हटविण्यास दिरंगाई : ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली
बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी (विहिरगाव) येथील मामा तलावातील अतिक्रम काढण्याबाबत ठराव घेण्यात आला. मात्र अतिक्रमण हटविण्यात दिरंगाई होत असल्याने येत्या शुक्रवारी (दि.१२) अतिक्रमण हटविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतला आहे.
येरंडी (देव) येथे १९६२ मध्ये मामा तलावाची निर्मिती करण्यात आली. तलावामध्ये गावातील १०-१२ लोकांनी अतिक्रमण करुन २० एकर शेतजमीन काढल्याचे सांगण्यात येते. गावातील मोजक्या लोकांनी काढलेल्या अतिक्रमीत शेतजमिनीमुळे तलाव पूर्ण भरल्यानंतर अतिक्रमण धारकांच्या शेतांमध्ये पाणी शिरुन पिकांचे नुकसान होते. यावर अतिक्रमण धारक शेतकरी स्वत:च्या मनमर्जीने वेळी-अवेळी तलावाचे गेट उघडून पाणी सोडतात. त्यामुळे खऱ्या जमिनीच्या मालकांना पाण्या अभावी धान उत्पादनापासून वंचित राहावे लागते.
यावर येरंडी (विहिरगाव) येथील १०१ शेतकऱ्यांनी तालुक्याचे तहसीलदार, अर्जुनी-मोरगाचे पोलीस निरीक्षक, वन परिक्षेत्राधिकारी नवेगावबांध यांना लेखी निवेदन देऊन तलावातील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. परंतु अजून पर्यंत या प्रकरणात कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.
अखेर गावातील शेकडो शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून विहिरगाव (येरंडी) ग्रामपंचायतच्या वतीने अतिक्रमण हटविण्याबाबतच्या विषयावर चर्चा करण्यासंबंधी १९ नोव्हेंबर २०१४ रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेला गावातील ३२८ महिला-पुरुष उपस्थित होते. सभेत विषयाच्या अनुषंगाने एकमत न झाल्याने हात वर उंचावून मतदान करण्यात आले. तलावातील अतिक्रमण हटविण्यात येऊ नये या बाजूने ७० ग्रामस्थांनी सहमती दर्शविली. तर अतिक्रमण हटविण्यात यावे या बाजूने २५८ ग्रामस्थांनी हात वर उंचावून कौल दिला.
सदर विषयावर बहुमत झाल्याने तलावातील अतिक्रमण हटविण्यावर विशेष ग्रामसभेत अखेर शिक्कामोर्तब झाले होते. ग्रामसभेत बहुमताने ठराव पारित होवून सात महिन्यांचा कालावधी होऊन सुद्धा त्या ठरावाची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा ग्रामसभेच्या त्या ठरावाला केराची टोपली दाखवून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी न लावता गावात असंतोष माजविण्याचा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. वेळोवेळी निवेदन देवून, ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्याचा ठराव मंजूर होऊन सुद्धा मामा तलावातील त्या अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण हटविण्यात आले नाही.
अखेर गावातील तक्रारकर्त्या १०१ शेतकऱ्यांनी मामा तलावातील अतिक्रमण हटविण्याचा निर्धार करून येत्या शुक्रवारी (दि.१२) तलावातील अतिक्रमण गावकरीच हटविणार असे गावकऱ्यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांना लेखी निवेदनातून कळविले आहे. गावकऱ्यांच्या या निर्धाराने गावात अराजकता माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तालुका प्रशासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. (वार्ताहर)

Web Title: The encroachment will be removed on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.