आंबेडकर चौकातील नाल्यांवर अतिक्रमण
By Admin | Updated: July 15, 2015 02:18 IST2015-07-15T02:18:50+5:302015-07-15T02:18:50+5:30
नगरातील मुख्य रहदारीचे ठिकाण आंबेडकर चौक असून त्याच्या जवळपास पुन्हा अतिक्रमण वाढले आहे.

आंबेडकर चौकातील नाल्यांवर अतिक्रमण
आमगाव : नगरातील मुख्य रहदारीचे ठिकाण आंबेडकर चौक असून त्याच्या जवळपास पुन्हा अतिक्रमण वाढले आहे. मुख्य मार्गावरील रहदारी ही मोठी गंभीर बाब आहे. नवीन तयार करण्यात आलेल्या नालीसमोर अनेकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले. या अतिक्रमणामुळे ये-जा करणाऱ्यांना धोक्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे हे अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नगरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण ही मोठी डोकेदुखीची समस्या आहे. आंबेडकर चौकापासून नगरप्रवेशपर्यंत अनेकांनी डांबरी रस्त्यावर अनेकांनी आपली दुकाने सुरु केली आहेत. रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे रहदारीला खूप अडचण होत आहे. तयार करण्यात आलेल्या नालीच्या मागे दुकान सुरु झाले असते किंवा मागे दुकान हटविले तर रहदारीस त्रास होणार नाही. मात्र सर्व नियम धाब्यावर ठेऊन राजरोसपणे अनेकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. दुकानासमोर ग्राहकांच्या गाड्या उभ्या केल्याने चारचाकी वाहनांना ये-जा करणे खूप धोक्याचे आहे. एखाद्या वेळी मोठा अपघात घडल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
रस्त्यांवरच केली जातात वाहने पार्क
आमगावातील मेन रोडवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. रस्त्यावरच वाहने पार्क करण्यात येत असल्याने ये-जा करण्यास नागरिकांना मोठाच त्रास होतो. आंबेडकर चौक ते कामठा चौक, आंबेडकर चौक ते देवरी मार्ग व आंबेडकर चौक ते स्टेशन रोडच्या दुतर्फा अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते अरूंद होत चालले असून रहदारी बाधित होण्यास हेच अतिक्रमण कारणीभूत ठरत आहे. संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन सदर समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.