वनविभागाच्या जागेवरचे अतिक्रमण सरपंचाला पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:34 IST2021-09-07T04:34:43+5:302021-09-07T04:34:43+5:30

वडेगाव : वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी पतीसोबत राहत असलेल्या महिला सरपंच कांचन भीमराव रामटेके यांना नागपूर खंडपीठाने अपात्र घोषित ...

The encroachment on the forest department's land cost the sarpanch dearly | वनविभागाच्या जागेवरचे अतिक्रमण सरपंचाला पडले महागात

वनविभागाच्या जागेवरचे अतिक्रमण सरपंचाला पडले महागात

वडेगाव : वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी पतीसोबत राहत असलेल्या महिला सरपंच कांचन भीमराव रामटेके यांना नागपूर खंडपीठाने अपात्र घोषित केले आहे. ग्राम चोरखमारा येथील हे प्रकरण असून वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमण त्यांना चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे.

तिरोडा तालुक्यातील ग्राम चोरखमारा ग्रामपंचायत सरपंचपदावर कांचन रामटेके सन २०१६ मध्ये निवडून आल्या होत्या. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केले होते. तेव्हा या प्रकरणी कविता गजभिये यांनी ही बाब लक्षात आणून दिली व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत त्यांना अपात्र घोषित केले होते. यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध रामटेके यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केली होती. परंतु आयुक्तांनीसुद्धा अपील खारीज केली. त्यामुळे सन २०१९ मध्ये रामटेके यांनी रिट याचिका दाखल केली होती. यात हायकोर्टाने सरपंच महिलेच्या पतीने गट क्रमांक- २० मोठा चोरखमारा येथे अतिक्रमण करून कांचन रिसोर्ट बांधले असल्याचे आपल्या निर्णयात म्हटले आहे.

याप्रकरणी वनविभागाने १६ ऑगस्ट २०१४ रोजी गुन्हा दाखल केला व २२ सप्टेंबर २०१५ रोजी अतिक्रमण काढण्यात आले होते. परंतु सरपंच रामटेके यांच्या पतीने पुन्हा वनविभागाच्या त्याच जागेवर सरपंचपदाचा फायदा घेऊन अतिक्रमण करून रिसोर्ट बांधले. तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पत्र दिले की त्यांच्या पतीने शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. तसेच त्यांनी जागेवरील ताबा नियमित करण्याकरिता अर्ज दिला होता. या संदर्भात अहवाल त्यांनी कोर्टासमोर पुरावा म्हणून सादर केला नाही. यावर सुप्रीम कोर्टाने इतर प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार याचिकाकर्त्या यासुद्धा पतीसोबत त्या जमिनीवर राहत असल्यामुळे त्यांना देखील अतिक्रमणधारक समजण्यात येईल. त्यामुळे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी सरपंच महिलेला अपात्र घोषित केले. कविता गजभिये यांच्यातर्फे वकील मोहम्मद अतिक व सरकारतर्फे वकील क्षितिज धर्माधिकारी यांनी बाजू मांडली.

Web Title: The encroachment on the forest department's land cost the sarpanch dearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.