अतिक्रमणधारकांना मिळणार स्थायी पट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:26 IST2018-03-29T21:26:58+5:302018-03-29T21:26:58+5:30
शहरातील संजयनगर-छोटा गोंदिया परिसरातील जवळपास ७०० अतिक्रमणधारकांना जमिनीचे स्थायी पट्टे मिळवून देण्यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी वन विभाग व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

अतिक्रमणधारकांना मिळणार स्थायी पट्टे
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : शहरातील संजयनगर-छोटा गोंदिया परिसरातील जवळपास ७०० अतिक्रमणधारकांना जमिनीचे स्थायी पट्टे मिळवून देण्यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी वन विभाग व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आता हा प्रस्ताव अंतीम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
प्राप्त माहितीनुसार शहरातील संजयनगर-छोटा गोंदिया परिसरातील जवळपास ७०० अतिक्रमणधारकांना जमिनीचे स्थायी पट्टे मिळवून देण्यासाठी आ. अग्रवाल यांचा पाठपुरावा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीत आ. अग्रवाल यांनी मंत्रालयात बैठक घेतली. तसेच हा परिसर झुडपी जंगलाच्या कायद्यातून मुक्त करुन अतिक्रमणधारकांना पट्टे देण्याची मागणी केली. या भागातील नागरिकांना मागील ३० ते ४० वर्षांपासून पट्टे न मिळल्याने रस्ते, वीज इतर मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. मागील ३० ते ४० वर्षांपासून या परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना या ठिकाणाहून हटविणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने हा या अतिक्रमणधारकांना स्थायी स्वरुपात पट्टे देऊन त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. अग्रवाल यांनी केली. यानंतर प्रधान सचिव खारगे यांनी जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांची बैठक घेवून त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. यात दिंरगाई केल्याबद्दल उप वनसंरक्षकांना धारेवर धरले. खारगे यांनी संजयनगर-छोटा गोंदिया परिसरातील अतिक्रमणधारकांना वन कायद्यातून मुक्त करुन स्थायी स्वरुपात पट्टे देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहे.
येत्या दोन तीन महिन्यात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे लवकरच या परिसरातील नागरिकांना स्थायी स्वरुपात जमिनीचे पट्टे मिळण्याची शक्यता आ. गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.