महिनाभरापासून रूग्णांचे वॉर्ड रिकामेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:43 IST2019-08-18T23:42:15+5:302019-08-18T23:43:10+5:30
मागील वर्षी पावसाळ्यात येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) प्रसूती वॉर्डात पावसाचे पाणी साचून महिला रुग्णांची गैरसोय झाली होती. ‘लोकमत’ने हा मुद्दा लावून धरल्यानंतर या इमारतीचे स्ट्रॅक्चरल आॅडिट करण्यात आले.

महिनाभरापासून रूग्णांचे वॉर्ड रिकामेच
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वर्षी पावसाळ्यात येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) प्रसूती वॉर्डात पावसाचे पाणी साचून महिला रुग्णांची गैरसोय झाली होती. ‘लोकमत’ने हा मुद्दा लावून धरल्यानंतर या इमारतीचे स्ट्रॅक्चरल आॅडिट करण्यात आले. त्यात ही इमारत जीर्ण झाली असल्याचीे बाब पुढे आली होती. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गंगाबाईच्या फर्शची उंची वाढविण्याचे आदेश दिले. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने आठवडाभरात हे काम करून देतो म्हणून रूग्णांचा मोठा वॉर्ड रिकामा करविला. परंतु महिनाभरापासून हे काम झाले नसल्याने पावसाळ्यात रूग्णांचे हाल होत आहेत.
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील वॉर्डात पाणी साचल्यानंतर या रुग्णालयातील अनागोंदी कारभार आणि प्रशासनाच्या वेळ काढू धोरणाची पोलखोल झाली होती. मागील वर्षी ६ जुलै रोजी या रुग्णालयाच्या इमारतीत पाणी साचून मोठी खळबळ उडाली होती. यात तीन वर्षांपासून बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिटच सार्वजनिक बांधकाम विभागाने केले नसल्याची बाब पुढे आली होती. जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना वेळीच उपचार मिळावा, यासाठी शासनाने येथे बाई गंगाबाई महिला रुग्णालय सुरु केले. रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९३९ मध्ये करण्यात आले. एकूण २०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात सध्या केवळ १८५ खाटाच उपलब्ध आहे. त्यामुळे बरेचदा दाखल रुग्णांची सख्या वाढल्यास त्यांना रुग्णालयाच्या वºहांड्यात खाटा लावून दाखल केले जाते.
रुग्णालयाच्या इमारतीला ८० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून इमारत जीर्ण झाली आहे. यामुळे पावसाळ्यात काही ठिकाणी गळती लागते. या रूग्णालयात महिला तसेच लहान बालकांना दाखल करुन उपचार केले जाते. त्यामुळेच जीर्ण झालेल्या इमारतीमुळे रुग्णांच्या जीवाला कुठलाही धोका होऊ नये, यासाठी या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी बीेजीडब्ल्यू रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला सन २०१५ पासून वारंवार पत्र दिले. पण तीन वर्षांचा कालावधी लोटूनही बांधकाम विभागाने इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केले नव्हते. त्यानंतर ‘लोकमत’ने हा विषय लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ दिवसांत इमारतीचा अहवाल मागीतला होता. त्यानंतर इमारतीचे स्ट्रक्टचरल आॅडिट करण्यात आले होते. याला वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतर १६ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी रुग्णालयाला भेट देऊन इमारतीची पाहणी केली.
तसेच या इमारतीच्या फर्शची उंची एक फुटाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच बांधकामाला सुरूवात करण्याचे सांगून बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात शस्त्रक्रियेसाठी येणाºया महिलांना थांबविण्यासाठी असलेला वॉर्ड महिनाभरापासून रिकामा करविण्यात आला. त्या वॉर्डात तोडफोड करून सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धे कामही केले नाही. त्यामुळे दररोज २५ गर्भवतींची हेळसांड रूग्णालयात होत आहे. शासनाने मागील वर्षी या कामासाठी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. परंतु काम अद्याप झाले नाही.
विभागाच्या दिरंगाईचा गर्भवतींना फटका
बीजीडब्ल्यू रुग्णालयाची जीर्ण झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत तयार करण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव सुद्धा मंजूर झाला आहे. मात्र आता पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीच्या फर्शची उंची एक फुटाने वाढविण्याचे काम सुरू करण्याचा फक्त कांगावा केला आहे. आठवडाभरासाठी रिकामा करण्यात आलेला गर्भवतींचा वॉर्ड आता महिना उलटूनही गर्भवतींना देण्यात आला नाही. किमान तीन फूट उंची वाढविणे आवश्यक होते. याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी.व्ही. रूखमोडे हे सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. विभागातील अधिकारी व विभागांच्या कारभाराच्या दिरंगाईत मात्र गरीब गर्भवती महिलांना फटका बसत आहे.