शालेय शिक्षणासह रोजगाराभिमुख शिक्षण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 01:07 IST2017-01-13T01:07:06+5:302017-01-13T01:07:06+5:30

शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देणे गरजेचे आहे. त्याशिवाय बेरोजगारी,

Employment oriented education is required with school education | शालेय शिक्षणासह रोजगाराभिमुख शिक्षण गरजेचे

शालेय शिक्षणासह रोजगाराभिमुख शिक्षण गरजेचे

नाना पटोले : समर्थ आदिवासी अनुदानित आश्रमशाळेचे स्नेहसंमेलन
केशोरी : शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देणे गरजेचे आहे. त्याशिवाय बेरोजगारी, बेकारी संपुष्टात येणार नाही. आपले शासन अलीकडे शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविण्याच्या प्रयत्नात असून अभ्यासक्रमामधून कौसल्य विकास अभ्यासक्रमावर अधिक भर देत आहे. आश्रम शाळेतील विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेत कमी पडू नये म्हणून त्यांच्यासाठी देखील सीबीएससी अभ्यासक्रम काढून शिक्षण देण्याची गरज आहे. अशा संस्थांनी पुढे येवून सीबीएससी अभ्यासक्रमाची शासनाकडे मागणी करावी, असे मत खा. नाना पटोले यांनी व्यक्त केले.
स्थानिक समर्थ आदिवासी अनुदानित आश्रम शाळेतील स्रेहसंमेलनाच्या उद्घाटनीय भाषणामधून ते मार्गदर्शन करीत होते.
उद्घाटन खा. नाना पटोले यांच्या हस्ते, माजी आ. दयाराम कापगते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून जनजागृती शिक्षण संस्थेचे सचिव केवळराम पुस्तोडे, नामदेव पाटील कापगते, अन्न व औषधी विभागाचे सहआयुक्त दादाजी गहाणे, प्रकाश पाटील गहाणे, काशिम जमा कुरेशी, प्राचार्य अशोक हलमारे, प्राचार्य होमराज कापगते, प्राचार्य शाम ठवरे, शामदेव रेहपाडे, आदिवासी युवा नेते हरिश्चंद्र उईके प्रामुख्याने उपस्थित होते.
आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले आणि वीर बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर नैपुन्य प्राप्त केल्याने त्या विजयी संघाचे कौतुक करीत खा. पटोले म्हणाले, शालेय शिक्षणामधून फक्त विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान मिळते. त्यामध्ये दैनंदिन जीवनाशी निगडीत ज्ञानाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यासाठी आपले शासन शिक्षण क्षेत्रात नवनवीन निर्णय घेवून ज्ञानरचनावादावर आधारित अभ्यासक्रम निर्माण करुन ज्ञानार्जनाबरोबर स्पर्धेत उतरण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाबरोबर शिक्षण देता येईल का? ते बघत आहे. या अभ्यासक्रमातील बदलामुळे परीक्षा पद्धतीशी सांगड घालण्यावर देखील भर घालीत असल्याचे सांगितले. आदिवासी व जंगल वेष्ठित भागात मोहफुलांचे उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात होत असून मोहफुलावरील बंदी उठविण्यात आली आहे. मोहफुलावर आधारित उद्योग निर्मितीकडे लक्ष देऊन या भागातील आदिवासी व गरीब लोकांची आथिक बाजू बळकट करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकातून मुख्याध्यापक कापगते यांनी या आश्रमशाळेच्या विकासाकरिता आमची संस्था सतत तत्पर आणि सक्षम असल्याचे सांगून त्यामुळेच आमच्या शाळेतील विद्यार्थी क्रीडाक्षेत्रात राज्यस्तरापर्यंत चमकली आहे. याचा शाळेला अभिमान आहे. त्यांनी शाळेची वाटचाल व गुणांची प्रगती सांगितली.
तीन दिवसीय स्रेहसंमेलनाप्रसंगी विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. संचालन देवा शेंडे यांनी केले. आभार प्राचार्य रामू लंजे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Employment oriented education is required with school education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.