रोजगार मिळवून देणारे अभ्यासक्रम सर्वांच्या आवाक्यात असावेत
By Admin | Updated: November 15, 2015 01:19 IST2015-11-15T01:19:08+5:302015-11-15T01:19:08+5:30
गृहविज्ञान (होमसायन्स) ही शाखा म्हणजे केवळ पाककला शिकविणारा अभ्यासक्रम नाही. या शाखेअंतर्गत चालणारे विविध ..

रोजगार मिळवून देणारे अभ्यासक्रम सर्वांच्या आवाक्यात असावेत
अधिष्ठाता नासरे यांचे परखड मत : मुलींना स्वयंपूर्ण करण्यासाठी शासनानेच पुढाकार घ्यावा
मनोज ताजने गोंदिया
गृहविज्ञान (होमसायन्स) ही शाखा म्हणजे केवळ पाककला शिकविणारा अभ्यासक्रम नाही. या शाखेअंतर्गत चालणारे विविध अभ्याक्रम हे अतिशय व्यापक आणि रोजगार व स्वयंरोजगार उभारण्यासाठी मोठे फायदेशीर आहेत. पण अवाक्याबाहेरील शुल्क आणि अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांची कमतरता असल्यामुळे या शाखेच्या वाटेला जाणारे विद्यार्थी कमी आहेत. शासनाने या शाखेकडे विशेष लक्ष दिल्यास यातून देशातच नाही तर विदेशात नोकरी मिळू शकते. एवढेच नाही तर स्वयंरोजगार उभारण्यास मदत होईल, असे मत गोंडवाना विद्यापीठाच्या गृहविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता (डिन) तसेच रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या माजी अधिष्ठाता प्रा.डॉ.माधुरी नासरे यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत डॉ.नासरे यांनी गृहविज्ञान विद्याशाखेचे अनेक पैलू उलगडले. हा अभ्यासक्रम मुलींसाठीच आहे असे कुठेही लिहिलेले नाही. त्यामुळे मुलेही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात असे त्यांनी स्पष्ट केले. मानवी जीवनाशी निगडित असलेल्या सर्व गोष्टींचा या विद्याशाखेच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यात बीएसएसी (गृहविज्ञान) सोबतच फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, टेक्सटाईल डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड कॅटरिंग, इंटेरियल डिझायनिंग, अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स आदी कोर्सेस हे याच शाखेतून चालविले जातात. पण काही जुन्या असलेल्या मोजक्याच कॉलेजमध्ये या अभ्यासक्रमासाठी अनुदान आहे. नवीन कॉलेजेसमध्ये हे सर्व कोर्सेस विनाअनुदानित तत्वावर चालविले जातात. त्यामुळे कॉलेजवाले विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी वसूल करतात. परिणामी सर्वसामान्य, गोरगरीब मुलांना त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे परवडत नाही. त्यामुळे इच्छा असूनही अनेक जणांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे शक्य होत नाही.
सध्या समाजात वाढत असलेली बेरोजगारी पाहता अशा रोजगाराच्या संधी देणारे अभ्यासक्रम खरे तर शासनाने अनुदान तत्वावरच चालवायला पाहीजे. ते शक्य नसेल तर किमान त्यांचे शुल्क नियंत्रित करायला पाहीजे. याशिवाय बंद केलेली ओबीसी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळायला पाहीजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी अशा अभ्यासक्रमांचा लाभ घेऊ शकतील, असे डॉ.नासरे म्हणाल्या.
रोजगाराच्या संधी या विद्याशाखेत कोणत्या अभ्यासक्रमांत जास्त आहेत याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, प्रत्येक अभ्यासक्रमातच रोजगाराच्या संधी आहेत. बीएएसी होमसायन्स मध्ये कुकूटपालन, विविध पदार्थ तयार करून ते शिकण्याचा स्वयंरोजगार करण्याची संधी आहे. हॉटेल मॅनेजमेंट करणारी मुले तर रिकामी राहातच नाहीत. या अभ्यासक्रमाच्या अनेक मुली आज बाहेरच्या देशात नोकरीला गेल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात हा अभ्यासक्रम अद्याप आलेला नाही. तो सुरू व्हावा अशी इच्छा व्यक्त करतानाच मुलींसाठी हा अभ्यासक्रम पूर्णपणे नि:शुल्क असावा अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली. एकीकडे मुलींना स्वयंपूर्ण बनविण्याच्या गोष्टी सरकारकडून केल्या जातात, मग मुलींना कोणत्याही अभ्यासक्रमासाठी किमान पदवीपर्यंतचे शिक्षण नि:शुल्क का देत नाही, असा सवाल प्रा.डॉ.माधुरी नासरे यांनी उपस्थित केला.
ओबीसी शिष्यवृत्ती बंद केल्यामुळे पुढील काळात अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहू शकतात. कारण त्यांना शिकविण्याची अनेक आई-वडिलांची ऐपतच नसते. शासनाने याचा जरूर विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
३१ आॅगस्ट २०१५ ला नागपूर विद्यापिठाच्या गृहविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. या कार्यकाळात केलेल्या कामांबद्दल सांगताना डॉ.नासरे म्हणाल्या, ट्रॅव्हल अॅन्ड टुरिझम हा तीन वर्षाचा डिग्री कोर्स तयार केला. याशिवाय या शाखेचे सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम सेमीस्टर पॅटर्न करून सिलॅबससुद्धा अपडेट करून अखिल भारतीय स्तरावरचा केला. अभ्यासक्रमातील विषय ‘चॉईस बेस’ करण्यासाठी भर दिला, पण शेवटच्या टप्प्यात पुरेसा वेळ मिळाला नसल्याने त्यातील त्रुटी दूर करून तो लागू करणे शक्य झाले नाही, असे डॉ.नासरे यांनी सांगितले.
गोंडवाडा विद्यापीठाच्या स्थापनेपासून आतापर्यंत तिथे गृहविज्ञान विभागाच्या अधिष्ठाता म्हणून पदभार सांभाळत आहेत. या विद्यापीठात बीएसएसी होमसायन्स, फॅशन डिझायनिंग हे अभ्यासक्रम आहेत. मात्र या विद्यापीठातील भौगोलिक परिस्थीतवर (जंगली प्रदेश) आधारित नवीन कोर्सेस आणल्यास विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधी वाढतील. नागपूर विद्यापीठात या शाखेचा अभ्यासक्रम चालविणारे जेमतेम २५ कॉलेज आहेत तर गोंडवाना विद्यापीठात ८ ते १० कॉलेजला होमसायन्स शिकविल्या जाते. ही संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.