रोजगार हमी योजनेची कामे पडली बंद

By Admin | Updated: June 7, 2016 07:40 IST2016-06-07T07:40:08+5:302016-06-07T07:40:08+5:30

तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतपैकी अनेक ग्रामपंचायतींच्या अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे बंद

Employment Guarantee Scheme has been closed | रोजगार हमी योजनेची कामे पडली बंद

रोजगार हमी योजनेची कामे पडली बंद

सुकडी (डाकराम) : तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतपैकी अनेक ग्रामपंचायतींच्या अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे बंद आहेत. शंभर दिवसांचे मजुरांना काम देण्याचे शासनाचे निकष असतानासुद्धा अनेक ग्रामपंचायतींनी रोजगार हमी योजनेची कामे मार्च महिन्यापासून बंद केली. ती कामे अद्याप सुरू करण्यात आले नाहीत.
तिरोडा तालुक्यातील खडकी-डोंगरगाव ग्रामपंचायतने मार्च महिन्यापासून रोहयोची कामे बंद केलेली आहेत. ही कामे अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकडे सरपंच, सचिव व ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, असा आरोप माजी सरपंच हितेंद्र बावणे यांनी केला आहे.
मार्च महिन्यापूर्वी एक महिना ग्रामपंचायतने गावातील मजुरांना कामे दिली. मात्र मार्च महिना लागताच काम बंद झाले. तेव्हापासून एप्रिल, मे व जून महिना लागला तरी गावातील गरीब, गरजू, शेतमजूर व शेतकऱ्यांच्या हातांना कामे नाहीत. त्यामुळे गावातील तरूण वर्गाने शहराकडे मजुरीसाठी पलायन केले आहे.
ग्रामपंचायतचे पदाधिकारी व सचिव यांच्या निष्काळजीपणामुळे गावातील मजुरांना १०० दिवससुद्धा कामे मिळू शकले नाही. ग्रामपंचायतचे पदाधिकारी राहूनही गावाचा विकास कसा करावा, हेच त्यांंना माहीत नाही. केवळ आपला विकास व्हावा, हाच दृष्टिकोण या पदाधिकाऱ्यांचा आहे, असा आरोपही सरपंच हितेंद्र बावणे यांनी केला आहे.
मजुरांना १०० दिवस कामे, शासनाचा हा मूलमंत्र आता फोल ठरला आहे. याकडे तिरोड्याचे तहसीलदार, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा खडकी-डोंगरगावकडे दुर्लक्ष केले आहे. येथील मजुरांना काम नसल्यामुळे गावातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे.
या प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देवून संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी करावी. तसेच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी सरपंच हितेंद्र बावणे यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Employment Guarantee Scheme has been closed