आॅनलाईन वेतन प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांची उपासमार
By Admin | Updated: November 27, 2014 23:37 IST2014-11-27T23:37:22+5:302014-11-27T23:37:22+5:30
आदिवासी आश्रम शाळेतील शासकीय व निमशासकीय आश्रम शाळेच्या आॅनलाईन वेतन प्रणालीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.

आॅनलाईन वेतन प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांची उपासमार
सडक/अर्जुनी : आदिवासी आश्रम शाळेतील शासकीय व निमशासकीय आश्रम शाळेच्या आॅनलाईन वेतन प्रणालीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.
शासनाच्या आॅनलाईन धोरणामुळे सर्व शासकीय व निमशासकीय दस्तावेज आता आॅनलाईन होत आहे. शासनाच्या सर्वच कारभारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचार होवू नये या दृष्टीकोणातून जवळजवळ बहुतेक कारभार आता आॅनलाईनच्या माध्यमातून होत आहे. शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रम शाळेचे सर्वच कर्मचारी व शिक्षकांचे वेतन हे आॅनलाईन सरसरळ बँकेतून व्हावे यासाठी मोठा खटाटोप सुरू आहे. पाच महिने होवूनही आता बहुतेक आश्रम शाळांचे आॅनलाईनचे काम होण्यास विलंब होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पण ज्या शाळांच्या कर्मचाऱ्यांचे आॅनलाईनचे काम पूर्ण झाले आहे, त्यांचेही वेतन काढण्यास विलंब होत असल्याची बाब आता पुढे येत आहे.
बहुतेक आश्रम शाळेतील लिपिकांना संगणकाचे पुरेशे ज्ञान नसल्यामुळे त्या शाळेतील मुख्याध्यापकांना हे आॅनलाईनचे काम शहराच्या ठिकाणी असलेल्या कंप्युटर इंस्टिट्युतमध्ये नेवून करावे लागत आहे. यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालय देवरी यांनी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या ४६ शासकीय व निमशासकीय आश्रम शाळेतील लिपिकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. पण ते कामसुद्धा त्या अधिकाऱ्यांनी केले नाही.
हे आॅनलाईन वेतनाचे काम करण्यासाठी संपूर्ण ४६ आश्रम शाळांचे काम कुठपर्यंत गेले याची साधी चौकशीही केलेली नाही. या संथगतीने चाललेल्या कामामुळे जवळजवळ सर्वच आश्रम शाळेचे वेतन पाच महिन्यांपासून झाले नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. रोजच्या गरजा भागविण्यासाठी लागणारा किराना, बाजार, मुलांना कपडे, शाळेचा शुल्क कसा द्यावा, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे येवून ठेपला आहे. ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी अप्पर आयुक्त नागपूर यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशीच वेतन आॅनलाईनची संथगती असल्यास आणखी दोन महिने वेतनासाठी लागू शकतात, असे त्यांनी सांगितले आहे. (शहर प्रतिनिधी)