आश्रमशाळेचे कर्मचारी वेतनापासून वंचित
By Admin | Updated: July 5, 2014 00:59 IST2014-07-05T00:59:28+5:302014-07-05T00:59:28+5:30
वासुदेव लंजे प्राथमिक आश्रमशाळा सडक/अर्जुनी येथील व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे कर्मचाऱ्यांचा पाच महिन्यांचे पगार झाले नाही.

आश्रमशाळेचे कर्मचारी वेतनापासून वंचित
सडक/अर्जुनी : वासुदेव लंजे प्राथमिक आश्रमशाळा सडक/अर्जुनी येथील व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे कर्मचाऱ्यांचा पाच महिन्यांचे पगार झाले नाही. पगार न झाल्यामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आपले पगार १० जुलैपर्यंत न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा सहायक आयुक्त समाज कल्याण गोंदिया यांना निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
आश्रम शाळेत नियमित अनागोंदी कारभार सुरू असल्याची चर्चा ऐकायला मिळत असते. परिपूर्ण विद्यार्थी संख्या आश्रमशाळेत नसतानादेखील कर्मचारी तारेवरची कसरत करीत ओढताण करून पूर्ण विद्यार्थीसंख्या दाखविण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून केला जातो. अशातच शाळा व्यवस्थापनाचे आर्थिक शोषण वाढतच राहते. त्याचा परिणाम पगार न होण्यामध्ये केला जातो. अशा परिस्थितीत कर्मचारी हतबल झालेले दिसतात.
अशाच प्रकार सडक/अर्जुनी येथील वासुदेव लंजे यांच्या आश्रम शाळेत घडला आहे. तेथील २०१४ च्या पाच महिन्यांचे पगार झाले नाही. असा प्रकार नेहमीच घडत असल्याचे कर्मचाऱ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. शासनाचे महिन्याचा एक तारखेला वेतन देण्याचे आदेश असूनसुध्दा वेतन महिन्याला तर मिळत नाहीच, पण चार ते पाच महिने पगाराला विलंब केला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. बँकांच्या किस्त थकीत होतात. पॉलिसी लॅप्स होतात. कौटुंबीक जीवनात आर्थिक अडचण निर्माण होऊन अनेक समस्या उद्भवतात. शासनाच्या संबधित अधिकाऱ्यांशी शाळा व्यवस्थापनाचे आर्थिक जिव्हाळ्याचे नाते आहेत. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांची बाजू न घेता व्यवस्थापनाची बाजू घेतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याची हिंमत व्यवस्थापनाची पुन्हा वाढत जाते. आश्रमशाळेतील या अन्यायकारी व्यवस्थेच्या संदर्भात व पाच महिन्याचा पगार लवकर व्हावा याकरिता लंजे आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. या तक्रारीच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री, सामाजिक न्याय विभाग मुंबईचे सचिव, आयुक्त समाजकल्याण पुणे, प्रादेशिक उपायुक्त नागपूर, जिल्हाधिकारी गोंदिया, पोलीस अधीक्षक गोंदिया, तहसीलदार सडक/अर्जुनी, ठाणेदार डुग्गीपार, खा. नाना पटोले, आ. राजकुमार बडोले यांना पाठविण्यात आले आहेत.
उपोषणाचा इशारा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ए.बी. फुल्लुके, एम.एस. नैकाने, जि.ए.भोंडेकर, बी.एस. निंबेकर, ई.एस.देशमुख, बी.एस. सूर्यवंशी, एफ.लटये, बी.आर.मस्के, डी.जी.भदाडे, एस.एस. कांबळे, आर.एच.बारबुध्दे यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)