निवडणूक निकालाच्या चर्चेत रमले होते कर्मचारी-अधिकारी
By Admin | Updated: May 17, 2014 00:20 IST2014-05-17T00:20:37+5:302014-05-17T00:20:37+5:30
अखेर निवडणुकीविषयी जय-पराजयाच्या चर्चांंना विराम मिळाला. तब्बल एक महिन्यापासून अविरत चालणार्या चर्चा अचानक बदलल्या आणि पुढे आली एक विशेष चर्चा.

निवडणूक निकालाच्या चर्चेत रमले होते कर्मचारी-अधिकारी
देवानंद शहारे/दिलीप चव्हाण - गोंदिया अखेर निवडणुकीविषयी जय-पराजयाच्या चर्चांंना विराम मिळाला. तब्बल एक महिन्यापासून अविरत चालणार्या चर्चा अचानक बदलल्या आणि पुढे आली एक विशेष चर्चा. नानांनी किल्ला काबिज केला आणि एक अभूतपूर्व विजय म्हणून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार क्षेत्राच्या इतिहासात याची नोंद झाली. या चर्चांंना जि.प. व जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील टपर्यांवर उधाण आले होते. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची थेट लढत होती ती भाजपचे नाना पटोले यांच्याशी. कोण बाजी मारणार, किती मतांनी निवडणूक जिंकणार याविषयीची चर्चा तब्बल एक महिन्यापासून नागरिकांत सुरू होती. कुणी नानांचे पारडे जड असल्याचे सांगायचे तर कुणी भाईजीच निवडून येतील, या तर्क-वितर्कावर रंगत आणायचे. शुक्रवारी निवडणूक निकालाच्या दिवसीही या चर्चांंना उधाण आले होते. भाजपचे नाना पटोले यांचे मताधिक्य जसजसे वाढत होते, तसतसी निवडणुकीची चर्चा गल्लोगल्लीत वार्यासारखी पसरत होती. नानांचे ५0 हजाराने मताधिक्य वाढल्यावर नानांचे सर्मथक रस्त्यावर उतरले होते. जणूकाही नानाच जिंकले, ही जाणीव त्यांना हेरून घेत होती. आपण केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाल्याचे आनंद ते व्यक्त करीत होते. भान हरवलेल्या आणि गल्लोगल्ली बेभान सुटलेल्या या तरूणाईला जिकडेतिकडे नानांचेच वेड लागले होते. नाना जिंकल्याच्या जल्लोषात वेडी झालेली ही तरूणाई आणि त्यांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. एकीकडे आतिषबाजी तर दुसरीकडे तरूणाईचा जल्लोषात सारे गाव न्हावून निघाले होते. घडीचे काटे जसजसे पुढे सरकत होते, तसतसे नानांचे मताधिक्य वाढत होते आणि कार्यकर्ते व सर्मथकांमध्ये एकच जल्लोष उसळत होते. एकीकडे रस्त्यावर जल्लोष तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून येत होते. बरेच कार्यालय ओस पडली होती. आज निवडणुकीचा निकाल लागणार असल्यामुळे अनेकांनी घरीच टीव्हीसमोर बसून निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष दिले. बर्याच कार्यालयात कर्मचार्यांचा अभाव जाणवत होता. तर नागरिकांनीही कार्यालयीन कामानिमित्त येण्याचे टाळले. त्यामुळे जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालये आज ओस पडली होती. या कार्यालयातील कर्मचारीमधील सुट्टीमध्ये कार्यालयासमोरील चहा-नास्त्याच्या टपरीवर मोठय़ा उत्कंठेने चर्चा करताना आढळले. निवडणुकीच्या या रणधुमाळीत कोण जिंकेल, कोण हरणार या उत्कंठेत डुबलेल्या या कर्मचारी व अधिकार्यांचे आपण कार्यालयातील पंखे सुरूच सोडून आल्याचे भानही हरपले होते. जिल्हा परिषदेच्या अनेक कार्यालयातील पंखे कुणीही नसतानासुद्धा सुरूच होते. सर्वच निवडणुकीच्या निकालावर तल्लीन झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बसून मोठय़ा स्क्रीनवर निवडणुकीचे निकाल पाहण्यात कर्मचारी व काही अधिकारी दंग होवून गेले होते.