अटकेच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
By Admin | Updated: August 26, 2015 01:42 IST2015-08-26T01:42:16+5:302015-08-26T01:42:16+5:30
नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या किशोर उपरीकर या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर यांना अटक करावी या मागणीला ..

अटकेच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
दाखल्यांसाठी नागरिकांच्या येरझाऱ्या : संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
भंडारा : नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या किशोर उपरीकर या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर यांना अटक करावी या मागणीला घेऊन शुक्रवारपासून सुरु असलेले काम बंद आंदोलन आज सोमवारीही यथावत होते. परिणामी दाखल्यांसह कामांसाठी येणाऱ्या नगरपरिषद कार्यालयात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दोन्ही गटातून भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मारहाण प्रकरणी भगवान बावनकर यांना अटक करावी अशी एकमुखी मागणी कॉस्ट्राईब नगरपरिषद संघटनेने केली आहे. जोपर्यंत बावनकर यांना अटक होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरुच राहील असा फतवाही संघटनेने काढला आहे. या निर्णयाने जनसामान्यांची कामे रखडली आहेत. दुसरीकडे अतिक्रमण निर्मूलनात सहकारनगर येथील एका महिलेच्या तक्रारीवरूनही भंडारा पोलिसांनी किशोर उपरीकर यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यावर उपरीकर यांनी म्हटले आहे की सदर तक्रार महिलेने दबावापोटी दिली असून धादांत खोटी आहे. महिलेला कुठल्याही प्रकारे धक्काबुक्की किंवा अनुचित प्र्रकार घडलेला नाही. परिणामी राजकीय द्वेशातून माझ्यावर आसूड ओढावला जात आहे असेही उपरीकर यांचे म्हणणे आहे. या दरम्यान नगरपरिषद कर्मचारी संघटनेने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. येत्या दोन दिवसात बावनकर यांना अटक करण्यात आली नाही तर विदर्भातील नगरपरिषद कर्मचारी संघटना आंदोलनात सहभागी होतील असेही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे. दरम्यान शुक्रवारी घटना घडल्यावर त्या दिवशीही नगरपालिकेत कुठलेही कामकाज झाले नाही. (प्रतिनिधी)