कर्मचारी परतले कामावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:30 IST2019-01-02T21:29:06+5:302019-01-02T21:30:06+5:30
नगर परिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग विना अट त्वरीत लागू करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेले नगर परिषद कर्मचाºयांचे आंदोलन अवर सचिवांच्या आश्वासनानंतर मंगळवारी (दि.१) तूर्त मागे घेण्यात आले.

कर्मचारी परतले कामावर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग विना अट त्वरीत लागू करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेले नगर परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन अवर सचिवांच्या आश्वासनानंतर मंगळवारी (दि.१) तूर्त मागे घेण्यात आले. सध्या तरी तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन मागे घेण्यात आल्याने बुधवारी (दि.२) नगर परिषद कर्मचारी कामावर परतले.
शासनाने अधिकारी वर्गाला सातवा वेतन आयोग लागू केला. मात्र नगर परिषद कर्मचाºयांना त्यापासून दूर ठेवण्यात आले. शासनाच्या या धोरणामुळे नगर परिषद कर्मचाºयांत चांगलाच रोष व्याप आहे. त्यामुळे शासनाच्या या धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य नगर परिषद- नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने नव वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून म्हणजेच १ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे अवघ्या राज्यातीलच नगर परिषद- नगर पंचायत कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले व नगर परिषद-नगर पंचायतींचा संपूर्ण कामकाज ठप्प पडला होता.
नगर परिषद कर्मचाºयांच्या या आंदोलनाची दखल घेत प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेत नगर परिषद प्रशासनाचे आयुक्त तथा संचालकांची बैठक संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थित मंगळवारी (दि.१) घेण्यात आली. बैठकीत नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून नगर परिषद कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी अपेक्षीत वित्तीय दायित्वाच्या माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर वेतन आयोग लागू करण्याबाबतच निर्णय घेण्यात येणार असे लेखी आश्वासन अव्वर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी दिले.
अव्वर सचिवांच्या लेखी आश्वासनानंतर नगर परिषद कर्मचारी संघर्ष समितीने मंगळवारी (दि.१) तुर्त आंदोलन मागे घेतले. विशेष म्हणजे, अव्वर सचिवांच्या आश्वासनावर हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी मागण्यांची २ महिन्यांत पुर्तता न झाल्यास समिती पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसणार असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
कामकाज सुरळीत सुरू
संघर्ष समितीच्या वरिष्ठांकडून मंगळवारी (दि.१) सायंकाळी बैठकीतील निर्णयाबाबत कळवून आंदोलन मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, जिल्ह्यातील नगर परिषद-नगर पंचायतींनी कामबंद आंदोलन मागे घेतले व बुधवारी (दि.२) सर्व कर्मचारी कामावर परतले. त्यामुळे सोमवारी बंद पडून असलेले नगर परिषद- नगर पंचायतींचे कामकाज बुधवारी सुरळीत सुरू झाले.