‘आपात्कालीन वैद्यकीय सेवा आपल्या दारी’ रुग्णांसाठी वरदान
By Admin | Updated: July 12, 2014 01:25 IST2014-07-12T01:25:32+5:302014-07-12T01:25:32+5:30
केंद्र आणि राज्य शासनाच्या अधिनस्थ आपत्कालीन वैद्यकीय सेवा आपल्या दारी रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. आजघडीला गोरेगाव तालुक्यातील १३६ रुग्णांना ...

‘आपात्कालीन वैद्यकीय सेवा आपल्या दारी’ रुग्णांसाठी वरदान
दिलीप चव्हाण गोरेगाव
केंद्र आणि राज्य शासनाच्या अधिनस्थ आपत्कालीन वैद्यकीय सेवा आपल्या दारी रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. आजघडीला गोरेगाव तालुक्यातील १३६ रुग्णांना सदर सेवेचा लाभ मिळाला आहे. अवघ्या काही वेळात आपात्कालीन वैद्यकीय सेवेमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
प्राप्त माहितीनुसार भारत विकास ग्रृपच्या अधिपत्याखाली आपात्कालीन वैद्यकीय सेवा सुरू आहे. औषधी, गाडी, वैद्यकीय अधिकारी, गाडीचालक, गाडीतील डिझेलपर्यंत संपूर्ण सुविधा भारत विकास ग्रृपच्या वतीने पुरविल्या जातात. भारत विकास ग्रृपने तयार केलेल्या या गाडीत अत्यावश्यक औषधी, एसी, व्हिलचेअर, स्ट्रेचर, आॅक्सीजन, रक्तदाब यंत्र, तापमान यंत्र, रक्तातील आक्सीजनची टक्केवारी मोजणारे यंत्र, प्रसूतीच्या सर्व सुविधा, गाडीत पाण्याची सोय सलाईन स्टँड, खासपुरवठा यंत्र, इनर्व्हटर इत्यादी सुविधा गाडीत २४ तास उपलब्ध आहेत. दवाखान्यात प्राप्त सर्व सुविधा गाडीतच असल्यामुळे रुग्णांसाठी सोयीचे होत आहे.
या अत्याधुनिक सुसज्ज गाडीत चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. चार वैद्यकीय अधिकाऱ्याला पूर्णवेळ रजा तर बाकीच्या तिघांना आठ-आठ तास आळीपाळीने रुग्णांच्या सेवेत तत्पर राहावे लागते. तीन गाडीवाहक असून यापैकी दोन वाहकांना १२ तास कर्तव्यावर राहावे लागते. यातील तीसरा वाहक बुधवार आणि शनिवारला आपले कर्तव्य बजावतो.
आजपर्यंत या आपात्कालीन वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून प्रसूतीचे जवळपास ४५ रुग्ण व अपघाताचे ४० रुग्णांना सेवा पुरविण्यात आली आहे. इतरमध्ये बेशुध्द रुग्ण, सर्पदंश, विंचूदंश, हृदयरोगी यांना या सेवेचा लाभ मिळाला आहे.
या आपात्कालीन वैद्यकीय सेवेत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही सेवा चालविण्यासाठी पुण्यावरून विशेष यंत्रणा काम पाहते. एखाद्या रुग्णाने या वैद्यकीय सेवेच्या १०८ या क्रमांकावर फोन लावला तर फोन सरळ पुणे येथे धडकतो. लगेच पुण्यावरून स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांशी कॉन्फरन्सद्वारे बोलणी होते.
रुग्णांकडून रुग्ण कुठे आहे याची माहिती मिळाल्यानंतर वाहन चालकाला पुण्यावरून लागलीच मोबाईलवर मॅसेज येतो. यात विशेष म्हणजे आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील वाहन कोणत्या जागेवर आहे हे जीपीआरएसच्या माध्यमातून त्यांना दिसते. त्यामुळे सदर वाहनाचा उपयोग रुग्णांसाठी होतो. या सर्व सोईसुविधेमुळे रुग्णांना बराच फायदा होत आहे. यासाठी डॉ. आशिष मेश्राम, डॉ. प्रितम डहाके, डॉ. योगेंद्र भगत, डॉ. आशिष रहांगडाले अथक परिश्रम घेत आहेत.