हत्तीरोग दुरीकरण मोहीम गुुरुवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST2021-06-30T04:19:17+5:302021-06-30T04:19:17+5:30

गोंदिया : केंद्र शासनाच्या कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग आजार दुरीकरणासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १ जुलै ते १५ जुलै या ...

Elephant Disease Eradication Campaign from Thursday | हत्तीरोग दुरीकरण मोहीम गुुरुवारपासून

हत्तीरोग दुरीकरण मोहीम गुुरुवारपासून

गोंदिया : केंद्र शासनाच्या कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग आजार दुरीकरणासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील एकूण १४ लाख ५६ हजार ६०९ लोकसंख्येपैकी गरोदर माता, अतिगंभीर आजारी रुग्ण व २ वर्षांखालील बालके वगळता १३ लाख ५४ हजार ६४६ लोकसंख्या निवडण्यात आलेली आहे. ज्यामध्ये सर्व नागरिकांना एकाच दिवशी हत्तीरोग दुरीकरणाच्या दृष्टीने डीईसी व अलबेंडाझोलच्या गोळ्या खाऊ घातल्या जाणार आहेत.

गुरुवारपासून (दि.१) ही मोहीम सुरू होत असून, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या गोळ्या वयोगटानुसार वाटप करण्यात येतात. या गोळ्या जेवणानंतरच खायच्या असतात. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत वाटप करण्यात येणाऱ्या गोळ्यांचे सेवन हे कर्मचाऱ्यांच्या समक्षच करण्यात यावे, जेणेकरून शासनाने ठरविल्याप्रमाणे १०० टक्के लोकांनी गोळ्यांचे सेवन केल्याची खात्री होईल. या गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत. हत्तीरोग आजाराचे दुरीकरण या शासनाच्या मोहिमेत जनतेचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे, २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या अध्यक्षतेत जिल्हा समन्वय समितीची सभा घेण्यात आली होती. सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी कोणतीही शंका न बाळगता गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन केले.

-------------------------

एक गोळी हत्तीरोगापासून वाचवणार

एकदा हत्तीरोग बळावल्यावर उपाय नाही; परंतु हत्तीरोग होऊ नये म्हणून डीईसी गोळ्यांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा ‘हत्तीरोग’दिनी अशी सलग ५ वर्षे खाल्ल्यास हत्तीरोग होत नाही. त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होणे थांबते व पर्यायाने आपण स्वत: व आपली भावी पिढी हत्तीरोगापासून मुक्त राहू शकू. त्यामुळे मोहिमेंतर्गत प्रत्येकाने गोळीचे सेवन करावे, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी कळविले आहे.

Web Title: Elephant Disease Eradication Campaign from Thursday