धापेवाडाचे पाणी मिळण्यासाठी सतत चार दिवस वीज पुरवठा
By Admin | Updated: February 28, 2015 01:02 IST2015-02-28T01:02:51+5:302015-02-28T01:02:51+5:30
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने केल्या जाणाऱ्या विद्युत पुरवठ्यादरम्यान ग्रामीण भागात दररोज आठ तास लोडशेंडीग व आठ तास सिंगल फेज विद्युत पुरवठा ...

धापेवाडाचे पाणी मिळण्यासाठी सतत चार दिवस वीज पुरवठा
तिरोडा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने केल्या जाणाऱ्या विद्युत पुरवठ्यादरम्यान ग्रामीण भागात दररोज आठ तास लोडशेंडीग व आठ तास सिंगल फेज विद्युत पुरवठा असे शेती फिडरसाठी वेळापत्रक तयार केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांंना रबी हंगामासाठी पिकांना पाणी देणे कठीण होते. यासंदर्भात आ.विजय रहांगडाले यांनी शासन स्तरावर केलेल्या पत्रव्यवहारानंतर यावर महत्वपूर्ण बैठक होऊन शेतकऱ्यांना सतत चार दिवस पूर्ण विद्युत पुरवठा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
धापेवाडा उपसा सिंचन टप्पा १ करीता १६ तास सतत वीज पुरवठा असून दररोज आठ तास भारनियमन होते. त्यात पाणी उपसा करण्यासाठी मोठमोठ्या मशीन वापरण्यात आल्या आहेत. त्या मशीन सुरळीत वेगात येण्यासाठी ६ तासांचा कालावधी लागतो. पर्यायाने दररोज १० तास पाण्याचा उपसा होऊन आठ तास भारनियमन झाल्याने पाण्याचा उपसा खंडीत होतो. पर्यायाने दुसऱ्या दिवशीसुध्दा ६ तास मशीनला सुरळीत सुरू होण्यासाठी लागतात. याचा परिणाम म्हणून शेवटपर्यत पाणी पोहचत नव्हते.
या परिस्थितीत बदल करावा यासाठी आ. विजय रहांगडाले यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, महावितरणचे मुख्य अभियंता बापट, अधीक्षक अभियंता फुलकर, धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प विभाग तिरोडाचे अभियंता वासटकर व तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात यापुढे सतत चार दिवस विद्युत पुरवठा देवून उरलेले तीन दिवस भारनियमन देण्यात यावे, असे ठरले यामुळे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचणार आहे. यातून शेतकरी रबीचे पीक घेऊ शकतील. (प्रतिनिधी)