वीजेच्या दाबाने उपकरणे, वायरिंग जळाली
By Admin | Updated: March 18, 2016 02:07 IST2016-03-18T02:07:50+5:302016-03-18T02:07:50+5:30
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गंगाझरी (एकोडी) येथील सहायक अभियंता कार्यालयांतर्गत काचेवानी ...

वीजेच्या दाबाने उपकरणे, वायरिंग जळाली
जीवित हानी टळली : नागरिकांचे १५ ते २० लाखांचे नुकसान
काचेवानी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गंगाझरी (एकोडी) येथील सहायक अभियंता कार्यालयांतर्गत काचेवानी येथे अचानक वाढलेल्या विद्युत दाबामुळे गावातील एक मोहल्ला वगळता सर्व गावातील बहुतांश लोकांचे वीजेवरील ेसाहित्य जळाले. यात १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले.
काचेवानी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राजवळ महावितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर लागले आहे. १५ मार्च २०१६ ला सायंकाळी ७ वाजता गावात अचानक विद्युत दाब वाढला. यावेळी क्रिकेट मॅच सुरू असल्याने सर्वाच्या घरी विद्युत उपकरणे सुरू होती. ज्यात टीव्ही, फ्रिज, पंखे, कुलर आणि घरची वायरिंग जळाल्याची माहिती गावकऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.या व्यतिरीक्त घरी फिट केलेली वायरिंगही जळाली आहे. यामुळे एकूण १५ ते २० लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
ट्रान्सफार्मरच्या केबलची दुरूस्ती मराविवि कंपनीद्वारे करण्यात आली होती. परंतू घातलेला केबल हा निकृष्ट दर्जाचा असावा असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला. यापूर्वी या डीपीमध्ये अनेकदा फ्युज उडाल्याच्या घटना घडत आहेत. अनेक वेळा फ्युज वायरची व्यवस्था विद्युत विभागाने केली नसल्याने वायर सोलून जाड ताराने फ्यूज सुरू करती असतात. यामुळेच विद्युत दाब वाढताच त्याचा परिणाम घरच्या विद्युत पुरवठ्यावर आणि उपकरणांवर पडून गावकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.
डीपीवर फ्युज वायराचा उपयोग करण्यात आला असता तर डीपीवरील दाब वाढताच फ्यूज उडाला असता. परंतु जाड वायर असल्याने फ्युज उडाला नाही व दाबाचा झटका सर्व घरावर पोहोचला, असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
काचेवानीमध्ये विद्युत दाब वाढल्याने ग्राहकांचे नुकसान झाले हे खरे असले तरी विद्युत कनेक्शनच्या ठिकाणी अनेकांच्या घरी एलसीडी नसल्याने वाढलेला दाब हा सरळ कनेक्शनवर गेला आणि त्यातून विद्युत उपकरणांचे नुकसान झाले असल्याचे गंगाझरीचे (एकोडी) सहायक अभियंता अमित एस.चवरे यांनी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष व सरपंच यांने पती उमाशंकर चौधरी यांना दूरध्वनीवरून सांगितले.
यासंबंधी मिळाल्या माहितीनुसार, एबी फ्यूजची व्यवस्था नव्या डीपीमध्ये आहे. परंतु जुन्या डीपीमध्ये नसल्याने असे प्रकार घडू शकतात, असेही बोलले जात आहे. विद्युत विभागाने अशा प्रकारची पुनरावृत्ती अन्यत्र होवू नये याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा वीज ग्राहक करीत आहेत.
बल्ब फुटण्याच्या आवाजाने दहशत
घरच्या फिटिंगचे वायर जळाल्याने बल्ब जोराच्या आवाजात फुटल्याने घरच्या परिवारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्युत दाबाच्या नुकसानीमध्ये सर्वाधिक नुकसान विजय असाटी, प्रभू जांभूळकर, परमानंद कटरे, रवि कुंभरे आणि भोजराज पारधी सहीत शेकडो वीज ग्राहकांचे झाले आहे.
विद्युत डीपीकडे दुर्लक्ष
गावकऱ्यांनी विद्युत विभागावर आक्षेप नोंदविताना सांगितले, गावातील डीपीला फाटक नाहीत, पूर्णत: उघडी असल्याने कोणीही त्यात काहीही करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा भुर्दंड सर्वांना सोसावा लागतो. विद्युत विभागाच्या या हलगर्जीपणामुळे जीवित हानी होवू शकते. त्यामुळे याकडे जातीने लक्ष द्यावे, असेही नागरिकांनी बोलून दाखविले.
मोठी दुर्घटना टळली
विद्युत दाब वाढलेला होता त्यावेळी त्याची क्षमता ४४० व्होल्टच्यावर असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. वायरींग फटाक्याच्या वातीप्रमाणे जळत असल्याने अनेक घरी गोठ्यात जनावरांचा चारा, तणस भरलेले होते. अशा वेळी घराला किंवा गोठ्याला आग लागली असती तर गावात भयावह दुर्घटना घडली असती. मात्र यावेळी कोणत्याही शेतकऱ्यांने घरी तणस आणलेले नव्हते.