निवडणूक यंत्रणा झाली सज्ज

By Admin | Updated: June 25, 2015 00:43 IST2015-06-25T00:43:20+5:302015-06-25T00:43:20+5:30

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

The election machinery was ready | निवडणूक यंत्रणा झाली सज्ज

निवडणूक यंत्रणा झाली सज्ज

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ईव्हीएमची तपासणी पूर्ण, लगतच्या चार जिल्ह्यांशी राहणार समन्वय

गोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी २१६ तर आठही पंचायत समित्यांच्या १०६ जागांसाठी ३९९ उमेदवार निवडणुकीच्या लढतीत आहेत. पावसाचे दिवस पाहता मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण दक्षता घेत पर्यायी व्यवस्थाही सज्ज ठेवली असल्याची माहिती बुधवारी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी उमेश काळे यांनी पत्रपरिषदेत दिली.
४ लाख १४ हजार ३०२ पुरूष आणि ४ लाख ९ हजार १३१ महिला मतदार असे एकूण ८ लाख २३ हजार ४३४ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यासाठी गोंदिया तालुक्यात २६६ मतदा केंद्र, आमगाव तालुक्यात १३५, देवरी १०९, गोरेगाव ११६, तिरोडा १५०, सडक-अर्जुनी १०९, अर्जुनी मोरगाव १३२ तर सालेकसा तालुक्यात ८८ मतदान केंद्र राहणार आहेत.
विशेष म्हणजे अद्याप कोणत्याही पक्षाकडून किंवा उमेदवाराकडून आचारसंहिता भंग झालेली नाही. त्याबाबतची कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
मतदानासाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशिनची तपासणी करून त्या स्ट्रॉँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेदरम्यान कुठेही कोणता तांत्रिक बिघाड झाल्यास अतिरिक्त मशिनही उपलब्ध असून ईव्हीएमचे तंत्रज्ञही सज्ज राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)

१५ दिवसांत साडेचार लाखांची दारू जप्त
निवडणुकीच्या काळात दारूचे आमिष देऊन मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जातो. त्याला आळा घालणयसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू गाळणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा फास आवळला आहे. दि.५ ते २२ जूनपर्यंत या विभागाने ५० हजार ७५० रुपयांची देशी-हातभट्टीची दारू, ३ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा मोहा सडवा, ३२५० रुपयांचे मोहफुल आणि ५८ हजार १४३ रुपयांचे साहित्य असा ४ लाख ६१ हजार ५४३ रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती अधीक्षक नितीन धार्मिक यांनी यावेळी दिली.

चारही जिल्ह्यांच्या सीमेवर नाकाबंदी
गोंदियासह लागून असलेल्या भंडारा, मध्यप्रदेशातील बालाघाट आणि छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्याच्या सीमेवर दि.२६ पासून नाकेबंदी केली जाणार आहे. त्यामुळे अवैध मार्गाने येणारा दारूसाठा, पैसे किंवा कोणत्याही अनैतिक गोष्टींना आळा घालणे शक्य होणार आहे.

पाच तालुक्यांत मतदानाच्या वेळेत बदल
आमगाव, सालेकसा आणि देवरी या तीन तालुक्यातील मतदान केंद्रांवर ६ जुलै होणाऱ्या मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या केंद्रांवर सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ राहणार आहे. याशिवाय अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, गोठणगाव, बाराभाटी, ताडगाव, महागाव, केशोरी, भरनोली, पंचायत समितीच्या गणांमध्ये आणि सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली, कोकणा, शेंडा व बाम्हणी (ख) या पंचायत समिती गणांमध्ये मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच राहणार आहे.
मार्ग बंद झाल्यास पर्यायी व्यवस्था
पावसाचे दिवस असल्यामुळे अतिवृष्टी झाल्यास नदी-नाल्यांचा पूर येऊन काही मार्ग बंद होऊ शकतात. अशावेळी तेथील मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन व कर्मचाऱ्यांना पोहोचविण्यासाठी आणि मतदानानंतर त्यांना पुन्हा सुरक्षितपणे परत आणण्यासाठी दुचाकी, ट्रॅक्टरसह बैलगाड्यांचा आणि वेळच आली तर बोटीचा (डोंगा) वापर केला जाणार आहे.

Web Title: The election machinery was ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.