सोशल मीडियावर इलेक्शन फिव्हर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 06:00 IST2019-09-30T06:00:00+5:302019-09-30T06:00:09+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकीय बदलामुळे चारही विधानसभा क्षेत्रात इच्छुक उमेदवारांना ‘इलेक्शन फिव्हर’ चढल्याचे चित्र आहे. अद्याप कोणत्याच पक्षातून प्रबळ उमेदवारांची दावेदारी नसली तरी अनेक नवशे गवशे उमेदवार स्वत:ला भावी आमदार समजू लागले आहेत.

सोशल मीडियावर इलेक्शन फिव्हर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात ज्याप्रमाणे व्हायरल फिव्हरची साथ सुरु आहे. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकीय बदलामुळे चारही विधानसभा क्षेत्रात इच्छुक उमेदवारांना ‘इलेक्शन फिव्हर’ चढल्याचे चित्र आहे. अद्याप कोणत्याच पक्षातून प्रबळ उमेदवारांची दावेदारी नसली तरी अनेक नवशे गवशे उमेदवार स्वत:ला भावी आमदार समजू लागले आहेत. त्याच अविर्भावात मतदारांशी संवादही करु लागले आहेत. या उमेदवारांचे समर्थक सोशल मीडियावर आपल्याच उमेदवाराला तिकिट मिळणार असा दावा करुन मोकळे होत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षांच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जिल्ह्यात ठिकाणी घेतल्या जात आहेत. अनेक इच्छुक उमेदवार धार्मिक कार्यक्रम, महापुरुषांच्या जयंत्या, आरोग्य शिबिर आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधत आहेत.
उमेदवारांसाठी सर्वच पक्षात नवशा गवशांची रांग लागली आहे. कोणत्या विधानसभेत कोणाला तिकिट मिळणार यावर खलबते सुरु आहेत. अनेकजण तर ए.बी.फार्म मिळाल्याप्रमाणे चमकोगिरी करण्यात धूंद आहेत.
पक्ष या वेळी कोणत्या आधारावर कुणाला उमेदवारी देणार हे कळायला मार्ग नाही. मात्र इच्छुकांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवात झाली आहे. काही समर्थकांनी उमेदवारांच्या नावाने फेसबुकवर पेजेस तयार केले आहेत. त्यावर त्यांच्या दररोजच्या कार्यक्रमाची, दौऱ्याचा अगदी प्रचार सुरु असल्याप्रमाणे इत्यंभूत माहिती टाकली जात आहे. आता नेमका कुणाचा दावा खरा ठरणार आहे? आणि कोणता उमेदवार तिकिटाकरिता पात्र ठरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.