बाजार समितीची निवडणूक रंगात
By Admin | Updated: August 6, 2015 00:48 IST2015-08-06T00:48:07+5:302015-08-06T00:48:07+5:30
तालुक्यातील सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेसह महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या व वर्षाकाठी कोटींच्या घरात उलाढाल करणाऱ्या अर्जुनी-मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...

बाजार समितीची निवडणूक रंगात
१९ जागा, ४१ उमेदवार : किसान विकास आघाडी व परिवर्तन पॅनल ‘आमने-सामने’
अमरचंद ठवरे बोंडगावदेवी
तालुक्यातील सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेसह महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या व वर्षाकाठी कोटींच्या घरात उलाढाल करणाऱ्या अर्जुनी-मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काट्याची लढत होण्याचे चित्र आहे. बाजार समितीवर सत्ता स्थापनेसाठी तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसते. भाजपातील असंतुष्ट समजल्या जाणाऱ्या ‘पटकदलाची’ निती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा राजकीय गोटात वर्तविली जात आहे. बाजार समितीच्या घोडमैदानात भाजपा समर्थित किसान विकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तसेच पटकदल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असंतुष्ट गटाचे परिवर्तन पॅनल सर्वशक्तिनिशी उतरले आहेत.
सहकार क्षेत्रामधून बाजार समितीची आर्थिक बाजू संपन्न आहे. वर्षाकाठी कोटींच्या घरात आर्थिक लेखाजोगा करणाऱ्या बाजार समितीवर आपले अधिराज्य प्रस्थापित करण्यासाठी सर्व आयुधांचा वापर करुन प्रचार कार्यात तल्लीन झालेले दिसत आहे. विद्यमान भाजपा समर्थित पदाधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच भाजपातील एक संतुष्ट गट या तिघांनी एकत्र येऊन रंणागणात सर्वशक्तीनिशी उतरले आहेत. येत्या १६ तारखेला होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत १९ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील सहकारी संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी व अडत्या, हमाल व तोलारी, पणन व प्रक्रिया या गटातील एक हजार १४९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दोन्ही पॅनलने प्रचाराला गती देऊन प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेवून त्यांची मनसोक्त ईच्छापूर्ति करण्याचा सपाटा चालविलेला दिसत आहे.
तालुक्यातील सहकारी क्षेत्रातील संस्थेवर आजघडीला पाटील लॉबीचे वर्चस्व सर्वाधिक जास्त दिसत आहे. विद्यमान सत्ताधारी जातीय समिकरण डोळ्यासमोर देवून उमेदवारी देण्याचा टाहो जरी फोडत असले तरी या वेळी बाजार समितीच्या निवडणुकीत महाजन लॉबीवर अन्याय झाल्याची विद्यमान संचालकाची ओरड आहे. दिवसेंदिवस पाटील लॉबी वरचढ होत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या नामावलीवर नजर फिरविली तर आजघडीला बाजार समितीच्या रणांगणात महाजन लॉबीपेक्षा पाटील लॉबीला जास्त प्रमाणात उमेदवारी दिल्याचे दिसून येत आहे. महाजन लॉबीच्या एका विद्यमान संचालकास उमेदवारी नाकारल्याने आम्हाला विचार करावा लागेल, अशी भूमिका सदर प्रतिनिधीजवळ बोलून दाखविली.
बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदार संघात तालुक्यातील मातब्बर उमेदवार रिंगणात असल्याने तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत मतदार संघातील चार जागांसाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांच्या नामावलीवर नजर टाकली तर सर्वाधिक जास्त ठेकेदारी व्यवसायात गुंतलेले दिसून येत आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील अनेक दिग्गजांनी ऊडी घेतल्याने तालुक्यातील जनतेचे लक्ष सदर निवडणुकीकडे लागलेले दिसत आहे. सेवा सहकारी संस्था गटामध्ये ४४७ तर ग्रामपंचायत मतदार संघात सर्वाधिक जास्त ५८२ मतदार आहेत. रोवण्याच्या हंगामात मतदार असल्याने मतदारांचे चांगले दिवस येवून पाहुणचाराची संधी चालून आलेली दिसत आहे.