निवडणूक प्रचार साहित्य पुरवठादारांचे ‘बल्ले-बल्ले’
By Admin | Updated: December 27, 2016 02:08 IST2016-12-27T02:08:51+5:302016-12-27T02:08:51+5:30
सर्व पक्षांनी आपापल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर नगर परिषद निवडणुकीच्या

निवडणूक प्रचार साहित्य पुरवठादारांचे ‘बल्ले-बल्ले’
होर्डिग्स-पॉम्प्लेटची मागणी : जोर दाखविण्यासाठी धडाक्यात वापर
गोंदिया : सर्व पक्षांनी आपापल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग घेतला आहे. रिंगणात उतरलेले उमेदवार आपापल्या प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरत असून यात होर्डींग्स व पॉम्प्लेटची मागणी सर्वात जास्त आहे. यामुळे सध्या प्रचार साहित्य पुरवठादारांचे चांगलेच फावले असून त्यांना सुगीचे दिवस आले आहे.
निवडणूक म्हटली की प्रचार हा भाग अतिशय महत्वाचा आहे. जोपर्यंत मतदार राजाला रिंगणातील उमेदवार कोण जाणून घेतल्यावर उमेदवाराचा चेहरामोहरा त्याच्या नजरेत व डोक्यात ठासला जात नाही. तोपर्यंत त्या उमेदवाराची प्रसिद्धी काही वाढत नाही. यासाठीच योग्य तो प्रचार करणारेच नेहमी अग्रेसर असतात. नेमकी हीच ट्रीक यंदाही नगर परिषदेच्या निवडणुकीत वापरली जात आहे. येत्या ८ तारखेला नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत. आता दिवस कमीच उरल्याने प्रत्येकच उमेदवार आपापल्या प्रचाराला जोमाने लागला आहे.
नगरसेवकांसह नगराध्यक्षपदासाठीही यंदा जनतेलाच मतदान करावयाचे असल्याने प्रत्येकच राजकीय पक्ष सुद्धा प्रभागातील आपले उमेदवार तसेच नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांसाठी प्रचार करीत आहेत. यासाठी शहरात बघावे तेथे होर्डींग्स लागलेले दिसून येत आहेत. शिवाय प्रत्येक शहरवासीयांच्या घरापर्यंत उमेदवार कोण हे कळावे यासाठी पॉम्प्लेट्स वाटले जात आहेत. याशिवाय झेंडे, बिल्ले व प्रचार वाहनांचाही जोमात वापर केला जात आहे. प्रचाराच्या नवनवीन फंड्यांमुळे अवघे शहर दणाणून गेले आहे.
आज शहरातील प्रत्येक दर्शनी भागच काय तर गल्लीबोळातही उमेदवारांची होर्डींग्स लागलेले दिसून येत आहेत. शिवाय यात दिवसेंदिवस भर पडतच चालली आहे. यातूनच होर्डीग्स, पॉप्म्लेट व अन्य प्रचार साहीत्य पुरविणाऱ्यांची चांगलीच बल्ले-बल्ले होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रिंगणात शेकडो उमेदवार असून प्रत्येकालाच त्यांचे होर्डीग्स व पॉम्प्लेट व अन्य प्रचार साहीत्य घ्यावेच लागत आहे. त्यामुळे होर्डींग्स व प्रिटींगवाल्यांची चांदी झाली आहे. (शहर प्रतिनिधी)
प्रचाराची दुकानेच उघडली
४निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची सध्या दुकानेच उघडली आहेत. यात विविध राजकीय पक्षांचे झेंडे, बिल्ले, गमझे, टोप्या आदि नानाविध साहीत्य उपलब्ध आहेत. उमेदवार या पुरवठादारांकडून मोठ्या प्रमाणात साहीत्य खरेदी करून आपापल्या प्रभागात लावत आहेत. प्रभागात आपला जोर दाखविण्यासाठी शहरात सध्या जास्तीत जास्त होर्डीग्स, झेंडे व अन्य साहीत्य लावण्यास प्राधान्य दिले जात आहे. प्रभाग व शहरात कुठेही फिरल्यास आपल्याच पक्षाचा जोर दिसावा यासाठी ही सर्व धडपड सुरू आहे.
इमारतींवरही झळकताहेत होर्डिंग्स
४निवडणुकीला बघता सध्या शहरातील दर्शनी व उंचात उंच इमारतींचे महत्व वाढले आहे. अशा इमारतींवर सध्या निवडणुकांचे होर्डींग्स दिसत असून सर्वांचे लक्ष वेधून घेतात. इमारतींवर होर्डींग्स लावण्यासाठी संबंधीत इमारत मालकाची परवानगी हवी असते. मात्र संबंधातून ती मिळून जाते. हेच कारण आहे की, अशा दर्शनी भागांची बुकींग झाली असून त्यावर राजकीय पक्षांचे होर्र्डिंग्स झळकत आहेत.
तिरोड्यातही वाढला जोर
तिरोडा : येथील नगर परिषदेच्या ८ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सदस्यांच्या १७ जागांसाठी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रमुख पक्ष उतरले आहेत. भाजपा-सेना युती झालेली असून राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बसपा हे पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. भाजपाने नगराध्यक्ष व १५ सदस्य तर शिवसेना दोन सदस्य असा समझोता झालेला आहे. त्यानुसार आपआपले त्यांनी उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने न.प.अध्यक्षासह सर्व १७ सदस्यांचे अर्ज सादर केले असून सर्वच जागा लढवित आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून न.प.अध्यक्षासह काही जागा लढविल्या जात आहेत. नगराध्यक्षपदासाठी मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होणार असल्याचे चित्र दिसून येते.
तिरोडा येथील निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ ब मध्ये अशोककुमार असाटी, सुशिल ग्यानचंदानी, अविनाश जायस्वाल व नुकतेच भाजपात प्रवेश केलेले देवेंद्र तिवारी यांच्यातील लढत रंगतदार आहे. कोण बाजी मारते याकडे लक्ष लागले आहे.
प्रभाग ५ अ मधून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील पालांदूरकर तर राष्ट्रवादीच्या वतीने प्रकाश ठाकरे यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ५ ब मधून भाजपाच्या श्वेता मानकर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री उपवंशी यांच्यात सरळ लढत आहे. प्रभाग ८ अ मधुन माया धुर्वे, छाया मडावी, सुरेखा राणे, सोनाली श्रीरामे तर ८ ब मधून गणेशप्रसाद कुंभारे, नरेश कुंभारे, बसंत नागपुरे, संजय बैस, राजकुमार बोहने, नोखलाल लिल्हारे यांचा समावेश आहे.
२९ डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घ्यायचे आहेत. कोण-कोण अर्ज मागे घेतात याकडे सुध्दा नागरिक व उमेदवारांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)