आठ धार्मिक स्थळे वांद्यात
By Admin | Updated: October 29, 2015 00:18 IST2015-10-29T00:18:50+5:302015-10-29T00:18:50+5:30
अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने शासनाकडून अनधिकृत धार्मिक स्थळांची विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

आठ धार्मिक स्थळे वांद्यात
गोंदिया : अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने शासनाकडून अनधिकृत धार्मिक स्थळांची विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गोंदिया शहरातील आठ धार्मिक स्थळांचा शोध घेऊन पालिका प्रशासनाने त्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहे. सन २००९ पूर्वीची ही स्थळे असल्याने आता नियमितीकरणाची गरज दिसून येत आहे. मात्र याबाबत समितीच बैठकीत निर्णय घेणार आहे.
मोकळी जागा मिळेल तेथे धार्मिक स्थळ उभारून अतिक्रमण करण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र शासकीय जागा असल्यास त्या जागेसाठी असलेले शासनाचे प्रयोजन कोलमडते. शिवाय खाजगी जागा असल्यास एखाद्याची संपत्ती हिरावली जाते. अतिक्रमणाच्या या वाढत्या प्रकारांमुळे धार्मिकस्थळांचे प्रमाणही झपाट्याने वाढत चालले आहेत. बघावे त्याला धार्मिकस्थळांसाठी जागा काबीज करण्याचे प्रकार सर्वत्र दिसून येत आहेत. या प्रकारावर आळा बसावा व अतिक्रमण करून करण्यात आलेल्या धार्मिकस्थळांवर कारवाई करून अतिक्रमण केलेली जागा मोकळी करावी या उद्देशातून शासनाने अनधिकृत धार्मिक स्थळांसाठी विशेष मोहीम छेडली आहे.
अतिक्रमण केलेली जागा मोकळी व्हावी हा या मोहिमेचा उद्दीष्ट असला तरीही, कुणाची धार्मिक भावना दुखावू नये, तसेच या धार्मिक स्थळांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये या दोन्ही बाजूंना सावरत शासन ही मोहीम राबविणार आहे. फेब्रुवारी २०१५ पासून शासनस्तरावर या मोहिमेचे कार्य सुरू आहे. याअंतर्गत तालुकास्तरावरून कारवाई केली जात असतानाच शहरातील धार्मिक स्थळांची जबाबदारी मात्र नगर परिषदेवर देण्यात आली आहे. त्यानुसार नगर परिषदेकडून शहरातील अशा धार्मिक स्थळांचा शोध घेऊन त्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)