आठ टक्के रोवण्या आटोपल्या

By Admin | Updated: July 14, 2015 02:15 IST2015-07-14T02:15:10+5:302015-07-14T02:15:10+5:30

गेल्या ४-५ दिवसात पावसाने हजेरी लावल्याने रोवण्यांनी वेग घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आठ टक्के रोवण्या

Eight percent of the rows were dropped | आठ टक्के रोवण्या आटोपल्या

आठ टक्के रोवण्या आटोपल्या

गोंदिया : गेल्या ४-५ दिवसात पावसाने हजेरी लावल्याने रोवण्यांनी वेग घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आठ टक्के रोवण्या आटोपल्याची माहिती कृषी विभागाने दिली. दरम्यान शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, कीटकनाशके, खते मिळण्यासाठी कृषी केंद्रांची तपासणी वाढविली असून अनियमितता बाळगणाऱ्या ११ कृषी केंद्रांना कृषी विभागाने नोटीस बजावत परवाने निलंबनाची टांगती तलवार उभी केली आहे.
ऐन लागवडीच्या हंगामात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. आता ग्रामपंचायत निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण वातावरण ढवळून निघत आहे. अशा परिस्थितीत यावर्षी शेतीकडे अनेकांचे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष झाले असले तरी आता रोवणीयोग्य पाऊस झाल्याने आणि नर्सरीही तयार झाली असल्याने ग्रामीण भागात रोवणीसाठी लगबग सुरू आहे.
जिल्ह्यात भात लागवडीचे क्षेत्र १ लाख ८४ हजार ९०० हेक्टर आहे. त्यापैकी ५ हजार १६३ हेक्टरमध्ये रोवणी तर १० हजार २०९ हेक्टरमध्ये आवत्या झाल्या आहेत. एकूण १५ हजार ३७२ हेक्टरमध्ये भातपिकाची लागवड झाली आहे. रोपवाटिकांची (नर्सरी) लागवड पूर्णपणे आटोपली आहे. मधल्या काळात पावसाने दांडी मारल्यामुळे रोपे मरणासन्न होण्याच्या मार्गावर होती. मात्र ५-६ दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असल्याने रोपांना जीवदान मिळण्यासोबतच रोवण्याही मार्गी लागल्या आहेत.
शेतकऱ्यांची कृषी साहित्य विक्रेत्यांकडून कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये, शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिचे बियाणे मिळावे, म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कृषी कार्यालयाच्या गुण नियंत्रण विभागाने जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांची रँडमली तपासणी सुरू केली आहे. त्यात आतापर्यंत २७७ केंद्रांची तपासणी आटोपली असून ११ केंद्रांमध्ये अनियमितता आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या केंद्रांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांचे परवाने निलंबित केले जाणार आहेत. या कारवाईदरम्यान ५२२ क्विंटल बियाण्यांच्या विक्रीस बंदी घालण्यात आली. त्या बियाण्यांची किंमत ३६ लाख ५४ हजार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

शेतकऱ्यांनी वापरले घरचेच बियाणे
यावर्षी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार ४६ हजार ३५० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली होती. प्रत्यक्षात ४५ हजार १२० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. मात्र त्यापैकी २६ हजार ९३६ क्विंटल बियाण्यांचीच विक्री होऊ शकली. शिल्लक असलेले बियाणे कंपन्यांकडे परत पाठविले जात आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी स्वत:च्याच शेतातील बियाणे वापरण्यास प्राधान्य दिल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे. स्वत:च्या शेतात उगविलेल्या धानावर मिठाच्या पाण्यात प्रक्रिया करून ते बियाणे म्हणून दोन वर्ष वापरता येऊ शकतात, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

तूर, तीळ, उसाचीही लागवड
जिल्ह्यात प्रमुख पिक धान असले तरी इतरही पिकांची लागवड केली जाते. आतापर्यंत लागवड झालेल्या इतर पिकांमध्ये तूर २७४२ हेक्टर, तीळ ३४३ हेक्टर, ऊस १०१ हेक्टर, भाजीपाला १२७ हेक्टर, हळद ९२ हेक्टर, अद्रक ६ हेक्टर, केळी ३ हेक्टर या पिकांचाही समावेश आहे.
गेल्यावर्षीपेक्षा पाऊस चांगला
यावर्षी पावसाने मधल्या काळात थोडी विश्रांती घेतली असली तरी दुबार पेरणीची वेळ येईल अशी अवकृपा पावसाने केलेली नाही. गेल्यावर्षी १३ जुलैपर्यंत जिल्ह्यात अवघा ११०.१ मिमी (सरासरीच्या २७.२ टक्के) पाऊस बरसला होता. यावर्षी ३३४.९ मिमी (सरासरीच्या ८२.०६ टक्के) पाऊस बरसला आहे. अशी स्थिती कायम राहिली तर यावर्षी पिकांची स्थिती उत्तम राहण्याची आशा आहे.

या कृषी केंद्रांवर निलंबनाची टांगती तलवार
 दुर्गा कृषी केंद्र, परसोडी, ता.सडक अर्जुनी
 हिमालय कृषी केंद्र, गोरेगाव
वक्रतुंड कृषी केंद्र, अर्जुनी मोरगाव
विजय कृषी केंद्र, सालेकसा
 अंबिका कृषी केंद्र, नवेगावबांध
 अंबुले कृषी केंद्र, सालेकसा
 जयकिसान कृषी केंद्र, रावणवाडी
 उन्नती कृषी केंद्र, देवरी
 जयदुर्गा कृषी केंद्र, आमगाव
 परमात्मा एक कृषी केंद्र, कावराबांध
 चेतन कृषी केंद्र, आमगाव

Web Title: Eight percent of the rows were dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.