शिक्षणमंत्र्यांची घोषणा हवेतच
By Admin | Updated: November 7, 2015 01:54 IST2015-11-07T01:54:21+5:302015-11-07T01:54:21+5:30
गुरुजी अर्थात शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता, प्रगतीची बाग फुलविणारा महत्वाचा घटक. मात्र सध्या सर्व शिक्षकवृंद आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत.

शिक्षणमंत्र्यांची घोषणा हवेतच
जिल्हा परिषद : शिक्षकांचे पगार उशिराच
इंदोरा बु : गुरुजी अर्थात शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता, प्रगतीची बाग फुलविणारा महत्वाचा घटक. मात्र सध्या सर्व शिक्षकवृंद आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. यासाठी शासनाचे धोरण कारणीभूत ठरत आहे. त्यांच्यासाठी केलेल्या घोषणाही हवेतच विरत आहेत.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीररित्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षकांना महिन्याच्या १ तारखेला वेतन दिले जाईल असे जाहीर केले होते. मात्र त्यांचे आश्वासन केवळ हवेतच राहिले. आॅगस्ट महिना संपला, सप्टेंबर व आॅक्टोबर महिनेही गेले पण कोणत्याच महिन्यात १ तारखेला पगार झाले नाही.
जिल्हा परिषदेच्या इतर विभागाकडे, वित्त विभागाकडे भरगच्च निधी असतो. काही विभाग हे कमिशनवर चालतात. तेथे निधी भरगच्च व शिक्षकांच्या पगारासाठी हेच जिल्हा परिषद मात्र शून्य अवस्थेत असते, याला कारणीभूत कोण? असा प्रश्न निर्माण होतो. पंचायत समिती स्तरावर शिक्षकांना कामे असतात. तेथेही शिक्षकांना अपमानित व्हावे लागते. शिक्षक सेवा पुस्तिकेत नोंदीसाठी गेले असता लिपिकाद्वारे शिक्षकांची कामे केली जात नाही.
सहा महिन्यांपासून दिलेल्या पत्राची नोंदसुद्धा करण्यात येत नाही व शिक्षकांना पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागतात, असेही शिक्षकांचे म्हणणे आहे. अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या शिक्षकांचे प्रश्न केव्हा मार्गी लागतील, हे अजून तरी कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. मात्र केवळ आश्वासनांची खैरात वाटली जाते, एवढे मात्र खरे. शासनाने शब्दाला जागावे अशी अपेक्षा केली जात आहे. (वार्ताहर)