विनयभंग प्रकरणातील आरोपींना शिक्षा
By Admin | Updated: March 18, 2017 01:45 IST2017-03-18T01:45:36+5:302017-03-18T01:45:36+5:30
सालेकसा व गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत विनयभंगाच्या दोन प्रकरणातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने

विनयभंग प्रकरणातील आरोपींना शिक्षा
गोंदिया : सालेकसा व गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत विनयभंगाच्या दोन प्रकरणातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने एका प्रकरणात तीन वर्षाचा तर दुसऱ्या प्रकरणात पाच वर्षाचा कारावास ठोठावला.
प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव तालुक्याच्या पाथरी/कुऱ्हाडी येथील मंगेश सुरेश टेंभूर्णीकर (२५) याने त्याच्या घराच्या बांधकामावर मजुरीसाठी येणाऱ्या २८ वर्षाच्या महिलेचा २० जून २०१४ रोजी सकाळी ११ वाजता विनयभंग केला. या प्रकरणावर बुधवारी न्यायाधीश एस.आर.त्रिवेदी यांनी सुनावणी केली. या प्रकरणातील आरोपी मंगेशला तीन वर्षाचा सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिन्यांचा कारावास सुनावला आहे. सरकारी वकील म्हणून अॅड. महेश चांदवानी यांनी काम पाहीले. न्यायालयीन कामकाजासाठी महिला पोलीस हवालदार सुधा गणवीर, आशा मेश्राम व इतर कर्मचाऱ्यांनी केली.
दुसऱ्या प्रकरणात सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कवडी येथील आरोपी कारू गोविंदा टेंभूर्णीकर (५०) याला पाच वर्षाचा सश्रम कारावास व व अडीच हजार रूपये दंड ठोठावला आहे.
सदर सुनावणी गुरूवारी जिल्हा सत्र न्यायाधीश क्र.२ माधुरी आनंद यांनी केली आहे. ४ जुलै २०१५ च्या दुपारी शेजारच्या ५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घटनेच्या वेळी पिडीत मुलीचे वडील तेथे पोहचल्याने त्या ठिकाणाहून आरोपी पसार झाला.
सालेकसा पोलिसांनी या संदर्भात भादंविच्या कलम ३५४ ब, ८, १२ बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात कलम ३५४ ब अंतर्गत ५ वर्षाचा सश्रम कारावास, कलम ८ अंतर्गत पाच वर्षाचा कारावास, कलम १२ अंतर्गत ३ वर्षाचा कारावास व अडीच हजाराचा दंड ठोठावला आहे. सरकारी वकील म्हणून अॅड.मेघा रहांगडाले यांनी काम पाहीले. (तालुका प्रतिनिधी)