पर्यावरणपूरक होळी साजरी करा-धुर्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2017 00:24 IST2017-03-12T00:24:15+5:302017-03-12T00:24:15+5:30
पर्यावरण व वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन करण्यास अग्रेसर सातपुडा फाऊंडेशन संस्थेद्वारा नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या ...

पर्यावरणपूरक होळी साजरी करा-धुर्वे
गोंदिया : पर्यावरण व वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन करण्यास अग्रेसर सातपुडा फाऊंडेशन संस्थेद्वारा नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक होळी सण साजरा कसा करावा, यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला.
नैसर्गिक घटक जसे पळसाची फुले व इतर वेगवेगळ्या रंगांचे फुले, पाने यापासून नैसर्गिक रंग कसे तयार करतात त्यांचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. पिवळा रंग पळसाच्या फुलांपासून, हिरवा रंग, पालक भाजीपासून, गुलाबी रंग, बिटपासून लाल रंग, लाल रंगाच्या फुलापासून तसेच गुलाल खेळायचा असेल तर याच रंगापासून बेसणात किंवा पिठात मिसळून त्यांना उन्हात वाळविल्यास गुलाल बनविता येतो.
बाजारात वेगवेगळ्या रंगाचे रंग व गुलाल उपलब्ध आहेत. आता तर फ्लोरोसेन्ट रंग व गुलाल सुद्धा उपलब्ध आहेत व या सर्व रंगात घातक असे रसायन मिसळलेले असल्याने त्याचा वाईट परिणाम होतो, हे मुकुंद धुर्वे यांनी सांगितले.
एक गाव एक होळी याबाबतही मुलांना समजावून सांगितले. समजा एका होळीत १०० किलो लाकूड जाळले तर जिल्हाभर किती मोठ्या प्रमाणात लाकुड जाळल्या जातात याबद्दलचे मार्गदर्शन केले.
जी.ई.एस. हायस्कुल कुऱ्हाडी, आदिलोक हायस्कुल बोळुंदा, जि.प. प्राथमिक शाळा बोळुंदा, बागडबन, मंगेझरी, मुंडीपार, भजेपार, बेरडीपार, वडेगाव, भिमराव हायस्कुल वडेगाव, हरिकृष्ण हायस्कुल कोडेलोहारा, आश्रम शाळा कोयलारी व मेंढा या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना फाऊंडेशनचे संवर्धन अधिकारी मुकुंद धुर्वे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व फाऊंडेशनचे जीवराज सलाम, सलीमकुमार धुर्वे यांनी मदत केली. (जिल्हा प्रतिनिधी)