एसटीला रिक्त पदांचे ग्रहण
By Admin | Updated: October 21, 2016 01:36 IST2016-10-21T01:36:26+5:302016-10-21T01:36:26+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा भंडारा विभाग हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील एकदम शेवटचा विभाग आहे.

एसटीला रिक्त पदांचे ग्रहण
भंडारा विभाग वाऱ्यावर : नियोजनशून्यतेमुळे वाढतोय तोटा
देवरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा भंडारा विभाग हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील एकदम शेवटचा विभाग आहे. या विभागात ४०० पेक्षा जास्त बसेस आहेत. याद्वारे भंडारा व गोंदिया अशा दोन जिल्ह्यांमध्ये प्रवासी वाहतूक केली जाते. परंतु या विभागाकडे एसटी महामंडळाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. सध्या या विभागात अनेक पदे रिक्त असल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
या विभागात विभाग नियंत्रकाचे, विभागीय वाहतूक अधिकाऱ्याचे पद रिक्त असून सहा आगारांपैकी फक्त एकाच आगारात (तुमसर) नियमित आगार व्यवस्थापक आहे. उर्वरीत पाचही आगारात तात्पुरते आगार व्यवस्थापक कार्यरत आहेत.
या विभागात सध्या यंत्र अभियंता चालन यांनाच विभाग नियंत्रकाचा कार्यभार आहे. परंतु असे असताना त्याच्याच कार्यकाळात वाहनांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. मार्ग बंद वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अपघाताचे प्रमाणसुध्दा वाढलेले आहे. तसेच मार्गस्थ बिघाडाचे प्रमाणही वाढलेले आहे. यावरून भंडारा विभागात वाहनांची देखभाल योग्य प्रकारे केली जात नसल्याचे सिध्द होते, अशी खंत देवरीचे सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी व्यक्त केली आहे.
भंडारा विभागात वाहकांच्या देखरेखीसाठी किंवा अपहार टाळण्याच्या दृष्टीने जे तपासणी पथक आहे त्यांना देण्यात आलेल्या गाड्या अर्ध्यापेक्षा जास्त नादुरूस्त असून विभागीय कार्यशाळेतच पडून आहेत.
ज्या गाड्या मार्गावर आहेत त्या गाड्या तात्पुरत्या दुरूस्त आहेत. त्यामुळे तपासणी पथकाची कामगिरी प्रभावी वाहनाअभावी शून्य असून अपहार प्रवृत्त वाहकाला त्यामुळे अपहारात चालना मिळालेली आहे. यातूनच या विभागाचे नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)