पुढच्या वर्षी लवकर या...
By Admin | Updated: September 28, 2015 01:56 IST2015-09-28T01:56:41+5:302015-09-28T01:56:41+5:30
‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..’ असा जयघोष करीत आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत सर्वांनी ...

पुढच्या वर्षी लवकर या...
गोंदिया : ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..’ असा जयघोष करीत आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पाला रविवारी (दि.२७) निरोप दिला. गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात झाल्याने शहरात सर्वत्र गणपतीच्या मिरवणुका दिसत होत्या. रविवारी सर्वाधिक विसर्जन असल्याने विसर्जनस्थळांवर एकच गर्दी दिसून येत होती.
मांगल्याची देवता समजल्या जाणाऱ्या गणरायाच्या या उत्सवाची गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांतही ख्याती आहे. त्यात गोंदिया शहरातील गणपती उत्सवाची बात काही औरच आहे. येथील काही मोठ्या मंडळांकडून साजरा करण्यात येणाऱ्या उत्सवाचे आणि विसर्जन मिरवणुकांचे सर्वांना आकर्षण असते. बाहेरगावाहून भाविक शहरातील उत्सव बघण्यास येतात. १७ सप्टेंंबर रोजी मोठ्या थाटात गणरायांची स्थापना करण्यात आल्यानंतर गेले १० दिवस सर्वत्र नवचैतन्याचेच वातावरण होते. त्यामुळेच गणरायाला निरोप देण्याचा दिवस उजाडला तेव्हा भाविक भावूक झाले होते.
रविवारी सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात झाल्याचे बघावयास मिळाले. कुणी हातात, कुणी डोक्यावर, कुणी हातठेल्यांवर तर कुणी चारचाकी वाहनांत गणरायांना वाजतगाजत घेऊन विसर्जनासाठी जात असल्याचे दिसले. गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका आकर्षणाचे केंद्रच होत्या. ढोलताशांवर नाचत आणि गुलाल उधळत तरूणाई ‘गणपती बाप्पा मोरया...’चा जयघोष करीत होते. रात्री उशिरापर्यंत मोठ्या मंडळांच्या मिरवणुका सुरू होत्या. (शहर प्रतिनिधी)
जलाशयांवर एकच गर्दी
शहरातील पांगोळी नदी, छोटा गोंदिया, खमारी, सरकारी तलाव, साई मंदिर नाग तलाव, रजेगाव घाट, छोटा गोंदिया देवतलाव येथे मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन केले जाते. त्यामुळे या जलाशयांवर एकच गर्दी दिसून आली. हजारोंच्या संख्येतील घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपती विसर्जनामुळे त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासकनाकडूनही खबरदारी घेतली जात होती.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
गणेश मंडळांच्या वाजतगाजत जाणाऱ्या मिरवणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणारी कोणतीही घटना घडू नये म्हणून शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. चौकाचौकांत पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. यासह वाहतूक पोलीसही त्यांच्यासोबत होते. विसर्जन स्थळांवरही पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. याशिवाय पोलीस वाहनांतूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांची गस्त सुरू होती.